ऑगस्टमध्येच येणार कोरोनाची तिसरी लाट; महाराष्ट्रासाठीही धोक्याची घंटा
कोरोना इम्पॅक्ट बातमी

ऑगस्टमध्येच येणार कोरोनाची तिसरी लाट; महाराष्ट्रासाठीही धोक्याची घंटा

नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात या महिन्यामध्ये होऊ शकते असा दावा एका अहवालामध्ये करण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यातच देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा फैलाव काही प्रमाणात सुरु होईल असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या लाटेमध्ये दिवसाला एक लाखांहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळून येतील अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेमध्ये परिस्थिती चिंताजनक झाल्यास दिवसाला रुग्णसंख्येचा आकडा दीड लाखांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हैदराबाद आणि कानपूरमधील भारतीय प्रौद्योगिक संस्था म्हणजेच आयआयटीमध्ये मथुकुमल्ली विद्यासागर आणि मनिंद्र अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या संशोधनानंतरच्या अहवालात हे दावे करण्यात आले आहेत. ऑक्टोबर महिन्यामध्येच तिसऱ्या लाटेतील रुग्णसंख्येचा उच्चांक दिसून येईल अशी शक्यताही व्यक्त करण्यात आलीय.

ब्लुमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार विद्यासागर यांनी एका ईमेलच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. केरळ आणि महाराष्ट्रामधील परिस्थिती पुन्हा चिंताजनक होऊ शकते असंही विद्यासागर म्हणाले असून ही या राज्यांसाठी धोक्याची घंटा असल्याचं सांगण्यात येत आहे. कोरोनाची तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेइतकी घातक नसेल असंही सांगितलं जात आहे.