शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी महाराष्ट्रात किसान सभेच्या नेतृत्त्वात शेतकरी मोर्चा मुंबईकडे रवाना
बातमी महाराष्ट्र

शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी महाराष्ट्रात किसान सभेच्या नेतृत्त्वात शेतकरी मोर्चा मुंबईकडे रवाना

मुंबई : केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या २ महिन्यांपासून दिल्लींच्या वेशींवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या मोर्चानं मुंबईकडे रवाना झाला आहे. या मोर्चामध्ये ट्रॅक्टर, जीप इत्यादी वाहनांसह हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. 26 जानेवारीला हा मोर्चा राजभवनावर मोर्चा धडकणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नाशिकच्या ईदगाह मैदानापासून या किसान मोर्चाला सुरवात झाली असून आज दुपारी मुंबईतील आझाद मैदानात येऊन पोहचणार आहे. नाशिक कसारा घाटामार्गे हजारो शेतकरी शहापूर तालुक्यातून मुंबईत दाखल होणार आहे. या मोर्चासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यातून हजारो शेतकरी सहभागी होत आहेत, अशी माहिती किसान सभेच्या वतीनं देण्यात आली आहे.

दरम्यान, किसान मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीसदेखील सज्ज झाले आहेत. मुंबईतील आझाद मैदानात देखील पोलीस प्रशासनाकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांकडून ड्रोन कॅमेरा यांचा देखील वापर करण्यात येत आहे. तसेच, बंदोबस्तासाठी मुंबई पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाच्या अनेक तुकडे देखील मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाल्या आहेत.

मुंबईत आझाद मैदानात मोर्चा दाखल झाल्यानंतर उद्या सकाळी 11 वाजता मुंबईतील आझाद मैदानात भाजप सोडून इतर सर्व पक्षातील नेते एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यात येणार आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. सकाळी 11 वाजता केंद्र सरकारच्या या धोरणाला विरोध केल्यानंतर हा मोर्चा राजभवनाच्या दिशेनं कूच करणार आहे.