पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण; पोलिसांच्या हाती लागला मोठा पुरावा
बातमी महाराष्ट्र

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण; पोलिसांच्या हाती लागला मोठा पुरावा

पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला एक वेगळे वळण लागले आहे. पुणे पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा लागला असून आत्महत्येच्या पाच दिवस आधी पूजा चव्हाण आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्यात अनेकदा फोनवरुन संभाषण झालं होतं. या सर्व संभाषणांचं रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागलं आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, पूजाच्या मोबाइलमध्ये सापडलेल्या या संभाषणांमधील एक संभाषण ९० मिनिटं चाललं होतं अशी सूत्रांची माहिती आहे. पूजा चव्हाणने ७ फेब्रुवारीला पुण्यात इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. आत्महत्येसाठी शिवसेनेचे यवतमाळमधील आमदार संजय राठोड यांना जबाबदार धरलं जात असून यामुळे २८ फेब्रुवारीला त्यांना वनमंत्रीपदाचा राजीनामादेखील द्यावा लागला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

प्राथमिकदृष्ट्या फोनमधील संभाषणावरुन समोरील व्यक्ती संजय राठोडच असल्याचं दिसत आहे. तिने आपली सर्व संभाषणं रेकॉर्ड केली होती. हे संभाषण बंजारा भाषेत झालं असल्याने आम्ही भाषांतर करुन घेत आहोत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. संजय राठोड आणि पूजा चव्हाण दोघेही एकाच आदिवासी बंजारा समाजातून होते. मूळची बीडची असणारी पूजा शिक्षणासाठी पुण्यात राहत होती. आत्महत्येनंतर तिच्यात आणि संजय राठोड यांच्यात संबंध असल्याचा आरोप झाला.

पूजाचा मोबाइल फोन ज्यामध्ये सर्व संभाषणांचं रेकॉर्डिंग आहे तो फॉरेन्सिकसाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस मोबाइलमधील सर्व डेटा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसंच आत्महत्येच्या २४ तास आधीचं यवतमाळ मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना मिळवलं असून फॉरेन्सिकसाठी पाठवलं आहे. फुटेजमध्ये पूजा राठोड ही संजय राठोड यांचा निकटवर्तीय अरुण राठोडसोबत दिसत आहे. अरुण आणि संजय राठोड यांचा अजून एक सहकारी विलास चव्हाण हे पूजासोबत पुण्यातील मोहम्मदवाडी येथील हेवन पार्कमध्ये एका भाड्याच्या घरात राहत होते. तिथेच तिचा मृत्यू झाला. पोलिसांना यवतमाळ मेडिकल कॉलेमजधून पूजाच्या फोन आणि सीसीटीव्ही फुटेजचा रिपोर्ट मिळाला आहे. मात्र अद्याप पोलिसांनी संजय राठोड यांच्या आवाजाचे सॅम्पल लॅबकडून मागवलेले नाहीत.