अमॅझॉनने दिली 8546 कोटी रुपयांची लाच; काँग्रेसचे गंभीर आरोप
राजकारण

अमॅझॉनने दिली 8546 कोटी रुपयांची लाच; काँग्रेसचे गंभीर आरोप

नवी दिल्ली : काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी आज पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. त्यांनी ई-कॉमर्स अमॅझॉनबाबतीत लाचखोरीचा आरोप केला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत गप्प का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सुरजेवाला यांनी या प्रकरणात सात प्रश्न उपस्थित केले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रणदीप सिंग सुरजेवाला यांनी याबाबत ट्वीट देखील केले आहे. त्यांनी असं ट्वीट केलं आहे की, ‘विदेशी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने गेल्या दोन वर्षात भारतात कायदेशीर शुल्काच्या नावे रुपये 8546 कोटी रुपयांचं पेमेंट केलं आहे. हे पैसे कथितपणे लाच म्हणून देण्यात आल्याचे आता समोर आले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत या आरोपांची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्यात यावी अशी मागणी केली.

सुरजेवाला यांचे सरकारला 7 प्रश्न
1. अमॅझॉनद्वारे 8546 कोटी रुपयांच्या तथाकथित लाच भारतात कोणत्या अधिकाऱ्याला किंवा व्हाइट कॉलर राजकीय नेत्याला देण्यात आली?
2. ही लाच मोदी सरकारला कायदे आणि नियम बदलण्यासाठी देण्यात आली आहे का, जेणेकरून छोट्या व्यावसायिकांचा व्यवसाय ठप्प होईल आणि अमॅझॉनसारख्या ई-कॉमर्स कंपनीचा व्यवसार सुरू राहिल?
3. अॅमेझॉनच्या सहा कंपन्यांनी मिळून 8,500 कोटींचे पेमेंट केले, या कंपन्यांचे परस्पर संबंध काय आहेत आणि या कंपन्यांचे इतर कोणत्या कंपन्यांशी व्यावसायिक संबंध आहेत? यांनी कुणाला पैसे दिले आहेत?
4. अमेरिका आणि भारतात लॉबिइंग तसंच लाचखोरी हे दोन्ही कायदेशीर गुन्हे असून त्यावर प्रतिबंध आहे, असं असताना मोदी सरकारच्या नाकाखाली 8,546 कोटी रुपयांच्या कथित लाच कशी देण्यात आली?
5 एखाद्या विदेशी कंपनीकडून तथाकथित लाच अशा स्वरुपात दिली जाणारी एवढी मोठी रक्कम राष्टीय सुरक्षेशी खेळ आणि तडजोड नाही आहे का?
6. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत? अमेझॉन कंपनीविरोधातील कथित लाच घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडे करतील का?
7. देशातील या तथाकथित लाचखोरी घोटाळ्याची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांकडून होऊ नये का?