तुम्हाला आपल्या राष्ट्रध्वजाची संहिता माहिती आहे का? जाणून घ्या
ब्लॉग

तुम्हाला आपल्या राष्ट्रध्वजाची संहिता माहिती आहे का? जाणून घ्या

येत्या दि.13 ते 17 ऑगस्ट या कालावधीत देशभर ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबविले जाणार आहे. या कालावधीत नागरिकांनी आपल्या देशावर राष्ट्रध्वज फडकवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या पार्श्वभुमिवर आपल्या राष्ट्रध्वज तिरंगा ध्वजाविषयी जाणून घेऊ या.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारताचा राष्ट्रध्वज हा भारतीय लोकांच्या आशा आणि आकांक्षाचे प्रतिनिधीत्व करतो. भारतीय राष्ट्रध्वज आपल्या राष्ट्राबद्यलच्या अभिमानाचे प्रतीक आहे. हा तिरंगा पूर्ण तेजाने फडकत राहण्यासाठी, त्याचे रक्षण करण्याकरीता अनेकांनी आपले प्राण पणाला लावले आहेत.

तिन रंगांनी बनलेल्या राष्ट्रध्वजाच्या रंगांबाबत व त्यावर अंकित अशोक चक्राबाबत संविधान सभेत डॉ. एस. राधाकृष्णन यांनी असे स्पष्ट केले की –‘भगवा किंवा केशरी रंग हा स्वार्थनिरपेक्ष त्यागाचा दर्शक आहे. आपल्या नेत्यांनी देखील भौतिक लाभांपासून तटस्थ राहिले पाहिजे आणि आपल्या कामामध्ये स्वतः ला वाहून घेतले पाहिजे, मध्यभागी असलेला पांढरा रंग हा प्रकाशाचा, आपल्या आचरणात मार्गदर्शन करणाऱ्या सत्याचा मार्ग आहे. हिरवा रंग हा आपले मातीशी असलेले नाते व ज्यावर इतर सर्वांचे जीवन अवलंबून आहे अशा वनस्पती जीवनाशी असलेले आपले नाते दर्शवितो. पांढऱ्या रंगाच्या मध्यभागी असलेले अशोक चक्र हे धर्म नियमांचे चक्र आहे. जे या ध्वजाखाली काम करतात त्यांची सत्य, धर्म किंवा सदाचार ही नियंत्रक तत्वे असली पाहिजेत. तसेच चक्र हे गतीचे दर्शक आहे. तेथे कुंठिततेत मृत्यू आहे. गतिमानतेत जीवन आहे. भारताने परिवर्तनाला कसलाही प्रतिरोध करू नये, त्याने गतिमान बनले पाहिजे व पुढे गेले पाहिजे. चक्र हे शांततापूर्ण परिवर्तनाच्या गतिशीलतेचे निदर्शक आहे.’

राष्ट्रध्वजाचे हे महत्व अबाधित राखण्यासाठी भारतीय ध्वज संहिता तयार करण्यात आली. तसेच राष्ट्रध्वजाशी संबंधित सर्व कृतींचे नियमन हे, बोधचिन्हे व नावे (अनुचित वापरास प्रतिबंध ) अधिनियम, 1950 ( 1950 चा अधिनियम क्रमांक 12) आणि राष्ट्र प्रतिष्ठा अपमान प्रतिबंध अधिनियम, 1971 ( 1971 चा अधिनियम क्रमांक 69) यांच्या तरतुदींद्वारे केले जाते. यासंदर्भात भारत सरकारच्या गृहमंत्रालयाने ध्वज संहिता तयार केली आहे. त्याची ओळख यानिमित्ताने करुन घेऊ या.

राष्ट्रध्वजाचा आकार, स्वरुप रंगः राष्ट्रध्वज तीन रंगांच्या पट्ट्यांचा असून तो समान रूंदीच्या तीन आयताकृती पट्ट्या किंवा जोड-पट्ट्या यांचा मिळून बनलेला असेल. सर्वात वरची पट्टी भारतीय केशरी रंगाची असेल तर खालची पट्टी भारतीय हिरव्या रंगाची असेल. मधली पट्टी पांढऱ्या रंगाची असेल व तिच्या मध्यभागी समान अंतराच्या 24 आऱ्यांचे नेव्ही ब्ल्यू रंगाचे (Navy Blue ) अशोक चक्र हे विशेषकरून स्क्रिन प्रिंट केलेले किंवा अन्य प्रकारे प्रिंट केलेले किंवा स्टेन्सिल केलेले अथवा योग्यरीतीने भरतकाम केलेले असेल आणि ते ध्वजाच्या दोन्ही बाजूनी पांढऱ्या पट्टीच्या मध्यभागी पूर्णतः दिसेल असे असेल. भारताचा राष्ट्रध्वज, हाताने विणलेल्या लोकर/ सूत / सिल्क/ खादी कापडापासून बनविलेला असेल. राष्ट्रध्वज आयताकृती आकाराचा असेल. ध्वजाची लांबी व उंची (रूंदी) याचे प्रमाण 3:2 इतके असेल.

ध्वज लावण्याची योग्य पद्वतःज्या ज्या ठिकाणी ध्वज लावण्यात येईल अशा प्रत्येक ठिकाणी त्याची प्रतिष्ठा राखून तो स्पष्टपणे दिसेल अशा रीतीने लावला पाहिजे. ज्या सरकारी इमारतींवर ध्वज लावण्याची प्रथा आहे. त्या इमारतींवर रविवार व सुट्टीचे दिवस धरून सर्व दिवशी ध्वज लावण्यात येईल आणि या संहितेमध्ये तरतूद केली असेल ती खेरीजकरून हवामान कसेही असले तरी सुर्योदयापासून ते सुर्यास्तापर्यंत ध्वज लावण्यात येईल. अशा इमारतींवर रात्रीसुद्वा ध्वज लावता येईल. मात्र काही अगदी विशेष प्रसंगीच तो रात्री लावावा. ध्वजारोहणाच्या वेळी ध्वज नेहमी झर्रकन वर चढवावा आणि उतरविताना मात्र तो सावकाशपणे व विधीपूर्वक उतरविण्यात यावा. जेव्हा ध्वजारोहणाची व ध्वज उतरवण्याची क्रिया समर्पक बिगुलाच्या सुरांवर करावयाची असेल तेव्हा ध्वजारोहणाची व उतरविण्याची क्रिया त्या सुरांच्या बरोबरच झाली पाहिजे. जेव्हा खिडकीची कड, सज्जा अगर इमारतीचा पुढील भाग अशा ठिकाणी आडव्या किंवा तिरक्या बसविलेल्या काठीवरून ध्वज फडकविण्यात येतो तेव्हा ध्वजाची केशरी रंगाची बाजू काठीच्या वरच्या टोकाकडे असावी. जेव्हा ध्वज भिंतीवर सपाट व आडवा लावण्यात आला असेल तेव्हा ध्वजातील केशरी रंगाचा पटृा सर्वात वर असावा. आणि जेव्हा ध्वज उभा लावण्यात आला असेल तेव्हा ध्वजातील केशरी रंगाचा पटृा त्याच्या ( ध्वजाच्या ) उजव्या बाजूस असावा म्हणजे ध्वजाकडे तोंड करून उभ्या असलेल्या व्यक्तीच्या डाव्या बाजूस असावा.

कटाक्षाने टाळावयाच्या बाबी- फाटलेला अथवा चुरगळलेला ध्वज लावता कामा नये. कोणत्याही व्यक्तीस किंवा वस्तुस मानवंदना देण्यासाठी ध्वज खाली आणू नये. दुसरा कोणताही ध्वज अगर पताका राष्ट्रध्वजापेक्षा उंच किंवा राष्ट्रध्वजावर आणि त्याच्या बरोबरीने लावू नये, तसेच ज्या काठीवर ध्वज फडकत असेल त्या काठीवर किंवा त्या काठीच्या वरच्या टोकावर फुले किंवा हार यांसह कोणतीही वस्तु ठेऊ नये अथवा बोधचिन्ह लावू नये.ध्वजाचा तोरण, गुच्छा अथवा पताका म्हणून किंवा अन्य कोणत्याही प्रकारे शोभेसाठी उपयोग करू नये. वक्त्याचे टेबल (डेस्क ) झाकण्यासाठी अथवा वक्त्याच्या व्यासपीठावर पडदा म्हणून राष्ट्रध्वजाचा वापर करू नये. ध्वजाचा ‘केशरी’ रंगाचा पट्टा खालच्या बाजूस येईल, अशा प्रकारे ध्वज लावू नये. ध्वजाचा जमिनीशी स्पर्श होऊ देऊ नये अथवा तो पाण्यावरून फरफटत नेऊ नये. ध्वज फाटेल अशा पद्वतीने लावू नये अथवा बांधू नये.

कोणत्याही स्वरूपात ध्वजाचा आच्छादन म्हणून वापर करता येणार नाही. सरकारमार्फत अथवा सेनादलांमार्फत तसेच केंद्रीय निमलष्करी दले यांच्यामार्फत काढण्यात येणाऱ्या अंत्ययात्रांचे प्रसंग यास अपवाद असतील. ध्वजाचा मोटार वाहन, रेल्वेगाडी किंवा जहाज यांच्या झडपांवर छतांवर, बाजूंवर किंवा पाठीमागच्या बाजूस आच्छादन म्हणून वापर करता येणार नाही. ध्वज फाटेल किंवा तो मलिन होईल अशा प्रकारे त्याचा वापर करता येणार नाही किंवा तो ठेवता येणार नाही. ध्वज फाटला असेल अथवा मळल्यामुळे खराब झला असेल तर तो कोठेतरी फेकून देऊ नये अथवा त्याचा अवमान होईल अशा रीतीने त्याची विल्हेवाट लावू नये. तर त्याचा मान राखाला जाईल अशा अन्य रीतीने तो संपूर्णतः नष्ट करावा. एखाद्या इमारतीचे आच्छादन म्हणून वापर करता येणार नाही. पोषाखाचा अथवा कोणत्याही प्रकारच्या गणवेशाचा भाग म्हणून वापर करता येणार नाही. तसचे त्याचे उशा, हातरूमाल, हात पुसणे किंवा पेट्या यावर भरतकाम करता येणार नाही. अगर छपाई करता येणार नाही. ध्वजावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहिता येणार नाही. ध्वजाचा जाहिरातीत कोणत्याही स्वरूपात वापर करता येणार नाही. अथवा ध्वज फडकविण्यात आलेल्या ध्वजस्तंभाचा एखादे जाहिरात चिन्ह लावण्यासाठी वापर करता येणार नाही. ध्वजाचा कोणतीही वस्तू घेण्याचे, देण्याचे, बांधण्याचे अगर वाहून नेण्याचे साधन म्हणू वापर करता येणार नाही. परंतु, विशेष प्रसंग आणि प्रजासत्ताक दिन व स्वातंत्रय दिन यांसारखे राष्ट्रीय सणांचे दिवस साजरा करण्याचा एक भाग म्हणून राष्ट्रध्वज फडकविण्यापूर्वी ध्वजाच्या आतील भागात फुलांच्या पाकळ्या ठेवण्यास कोणतीही हरकत असणार नाही.

राष्ट्रध्वजास मानवंदनाःध्वजारोहण करण्याच्या अथवा ध्वजावतरणाच्या प्रसंगी अथवा एखाद्या संचालनामधून ध्वज नेण्यात येत असताना अथवा पाहणी करीत असताना उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तींनी ध्वजाकडे तोंड करून सावधान स्थितीत उभे रहावे, गणवेशात उपस्थित असलेल्या व्यक्तींनी त्याला उचित रीतीने सलामी द्यावी. जेव्हा ध्वज दलाबरोबर नेला जातो तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या व्यक्ती, तो समोरून नेला जात असताना, सावधान स्थितीत उभ्या राहतील किंवा सलामी देतील.

अशा पद्धतीने ध्वज संहितेत राष्ट्रध्वजासंदर्भात तरतूदी दिल्या आहेत. आपला राष्ट्रध्वज हा आपल्या राष्ट्राच्या स्वाभिमानाचे प्रतिक असतो. त्याचा मान, सन्मान हा त्याच पद्धतीने राखण्याचे आपल्या साऱ्यांचेच कर्तव्य होय.

(संदर्भः भारतीय ध्वज संहिता)