राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा गो वैद्य यांचं निधन
बातमी महाराष्ट्र

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा गो वैद्य यांचं निधन

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा गो वैद्य यांचं निधन झालं. मा गो वैद्य यांनी संघाच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं होतं. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी नागपूरमधील स्पंदन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रविवार 20 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता अंबाझरी घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्यांच्या पश्चात पत्नी सुनंदा, तीन मुली- विभावरी गिरीश नाईक, डॉ. प्रतिभा उदय राजहंस, भारती जयंत कहू, तसेच पाच मुलगे- धनंजय, डॉ. मनमोहन (सह सरकार्यवाह, रा. स्व. संघ), श्रीनिवास, शशिभूषण व डॉ. राम (हिंदू स्वयंसेवक संघ, सह संयोजक) व बराच मोठा आप्त परिवार आहे.

मॉरिस कॉलेजमध्ये असताना 1943 सालापासूनच मा. गो. वैद्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक होते. 1948 साली गांधी हत्येनंतर संघावर बंदी आली, त्यावेळी त्यांनी भूमिगत राहून काम केले. 1966 पासून पुढे अनेक वर्षे पत्रकारिता करताना अनेक उत्कृष्ट अग्रलेख, विविध विषयांवर भाष्य लिहिणार्‍या मा. गो. वैद्यांना पत्रकारिता व समाजसेवेचे अनेक पुरस्कार मिळाले होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ”राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक, जेष्ठ संपादक आणि विचारवंत मा. गो. उपाख्य बाबूराव वैद्य यांना माझी विनम्र श्रद्धांजली. पूज्य गुरुजी यांच्यासह सर्व सरसंघचालकांसोबत काम करण्याचे, त्यांना जवळून अनुभवण्याचे भाग्य बाबुरावांना लाभले होते.

विधान परिषद सदस्य म्हणून त्यांची कारकीर्द सगळ्या लोकप्रतिनिधींसाठी सदैव आदर्शवत राहील. माझ्या लहानपणापासून बाबुरावजींशी माझा व्यक्तिगत व जवळचा संबंध राहिला आहे. मला कायम त्यांचे मार्गदर्शन आणि आशिर्वाद मिळाले आहेत. खरे तर बाबूरावजी शतायुषी होतील, हा ठाम विश्वास होता, परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. एक व्रतस्थ आणि ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व आपल्यातून गेले याचे अतीव दु:ख आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो. ॐ शांती.