लालबागचा राजा: वादाची परंपरा कायम, पहिल्याच दिवशी महिला सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की
बातमी मुंबई

लालबागचा राजा: वादाची परंपरा कायम, पहिल्याच दिवशी महिला सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की

मुंबई: गेले दोन वर्ष कोरोनामुळे राज्यातील सर्व सणांवर निर्बंध होते. त्यातून मुंबईतील गणेशोत्सवही सुटलेला नाही. दोन वर्ष भक्तांना आपल्या लाडक्या बाप्पाचं म्हणजेच लालबागच्या राजाचं दर्शन करण्यासाठी वाट पाहावी लागली होती. त्यानंतर यंदाच्या वर्षी अखेर कुठल्याही निर्बंधांशिवाय गणेशोत्सव पार पडतोय. आजपासून म्हणजेच गणेश चतुर्थीपासून दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला सुरुवात झालीये. त्यातच लालबागचा राजा म्हटलं की गर्दी ही आलीच. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच मोठ्या संख्येने भाविक राजाच्या दर्शनासाठी येत असतात. याच दरम्यान आज एक अप्रिय घटना घडली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

लालबागच्या राजाच्या दरबारात भाविक आणि सुरक्षारक्षकांमध्ये बाचाबाची झाली. मुखदर्शनाच्या रांगेत असलेली एक महिला आणि काही महिला सुरक्षारक्षकांमध्ये हा वाद झाला. यावेळी भाविक महिलेने महिला सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की केल्याचंही पाहायला मिळालं. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. या घटनेने गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी राजाच्या दरबारात काही काळ भक्तीमय नाही तर तणावाचं वातावरण पाहायला मिळालं.

नेमकं काय घडलं?

गणेशोत्सवाचा पहिला दिवस त्यातच दोन वर्षांनी बाप्पाचं दर्शन होणार म्हणून सकाळपासूनच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यातच काही महिला थांबायचा प्रयत्न करत होत्या. मात्र, पोलिसांकडून गर्दी पाहता कोणालाच थांबू दिलं जात नाहीये. या कारणावरुन महिला आणि महिला सुरक्षारक्षकांमध्ये बाचाबाची झालेली आहे. यावेळी महिलेने सुरक्षारक्षक असलेल्या महिलेला धक्काबुक्की केल्याचं पाहायला मिळालं. यामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण होतं. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. त्यानंतर सर्व पूर्ववत सुरु झालं.