डीएसके कुटुंबाला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा
पुणे बातमी

डीएसके कुटुंबाला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

मुंबई : बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी ऊर्फ डी. एस. के यांच्या विरोधात दाखल असलेल्या खटल्यामध्ये त्यांची पत्नी हेमंती यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. २०१८ पासून कुलकर्णी कुटुंबातील अनेकांना या फसवणुकीच्या आरोपाखाली तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं आहे. आजच्या निर्णयानंतर हेमंती यांची तुरुंगातून जामीनावर सुटका होणार आहे. मात्र याचवेळी न्यायालयाने डी. एस. के यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शुक्रवारी या प्रकरणामध्ये न्या. डी. पी. नाईक यांच्यासमोर सुनावणी झाली होती. त्यावेळी न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आता हेमंती यांना जामीन मिळाला असला तरी डी. एस. के यांच्या जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज करणार असल्याची माहिती डीएसके यांचे वकील अशुतोष श्रीवास्तवा यांनी दिली.

ठेवीदारांची कोटय़वधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कुलकर्णी यांच्यासह त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, बंधू मकरंद, पुतणी, जावई यांना अटक करण्यात आली आहे. १७ फेब्रुवारी २०१८ पासून दीपक कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती पोलिसांच्या ताब्यात आहेत. या प्रकरणामध्ये न्यायालयाने मध्यंतरी कुलकर्णी यांचे बंधू मकरंद यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला.