इंडोनेशियात चर्चसमोर बॉम्बस्फोट; शेकडो नागरिक जखमी
बातमी विदेश

इंडोनेशियात चर्चसमोर बॉम्बस्फोट; शेकडो नागरिक जखमी

मकस्सर : इंडोनेशियातील दक्षिण सुलावेसी प्रातांची राजधानी असलेल्या मकस्सर शहरात मोठा बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली आहे. मकस्सरमधील एका कॅथेड्रल चर्चसमोर हा स्फोट झाला असून, स्फोटाची तीव्रता इतकी होती की, मृतदेहाच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास कॅथेड्रल चर्चसमोर ही घटना घडली. बॉम्बस्फोटानंतर घटनास्थळी मृतदेहाचे अवयव छिन्न-विच्छन्न झालेले पडले होते. तर यात शेकडो लोक जखमी झाले असल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे. स्फोटानंतर घटनास्थळी अनेक मानवी अवयव विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. मात्र, हे अवयव बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या आरोपीचे आहेत की अन्य दुसऱ्याचे हे अद्याप निश्चित झालेलं नाही. बॉम्बस्फोटामागील कारणांचा शोध घेण्यासाठी आम्ही तपास सुरू केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस आयुक्त ई झुलपन यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

बॉम्बस्फोटातील जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. ज्या इमारतीजवळ कार उभी करण्यात आली होती, त्या इमारतीची मोठी हानी झालेली असून, पोलिसांनी परिसराला वेढा दिला असल्याचं स्थानिक वृत्तवाहिन्यांकडून सांगण्यात येत आहे.