झुरळांची पॉवर पनवेल नांदेड एक्स्प्रेस दीड तास रखडली, पुणे स्थानकात ड्रामा, रेल्वेच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर
पुणे बातमी

झुरळांची पॉवर पनवेल नांदेड एक्स्प्रेस दीड तास रखडली, पुणे स्थानकात ड्रामा, रेल्वेच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर

पुणे : मुंबईहून नांदेडच्या दिशेने निघालेली ‘पनवेल-नांदेड एक्स्प्रेस’ प्रवाशांनी पुणे रेल्वे स्थानकावर रोखून धरली. ट्रेनच्या एसी कोचमध्ये झालेल्या झुरळामुळे प्रवाशांनीच शनिवारी दि.५ ऑगस्टला सायंकाळी साडे सातच्या सुमारास ट्रेन तब्बल एक तास पुणे स्थानकावर रोखून धरली. त्यामुळे इतर रेल्वे गाड्यांना मोठा उशीर झाला असून, प्रवाशांना झुरळांचा मनस्ताप सहन करावा लागला. रेल्वे गाड्यांच्या स्वच्छतेबाबत प्रवाशांच्या सातत्याने अनेक तक्रारी येत असतात. अशीच एक तक्रार शनिवारी सायंकाळी पनवेल नांदेड एक्सप्रेस बाबत समोर आली आहे. गाडीतील झुरळांच्या समस्येला वैतागून प्रवाशांनी रेल्वे प्रवाशांनी गाडीलाच रोखून धरली. या मुळे रेल्वे प्रशासनाच्या स्वच्छतेसंदर्भातील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पनवेल- नांदेड एक्स्प्रेस सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचली. एक्स्प्रेस मध्ये प्रवास करणारे प्रवासी हे झुरळाच्या त्रासामुळे अत्यंत संतापले होते. त्यामुळे ट्रेन पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर प्रवाशांनी रोखून ठेवली. रेल्वे प्रशासनानं झुराळाबाबत तातडीने उपयोजना करण्याची मागणी केली. अन्यथा गाडी पुढे जाऊन देणार नाही असा थेट इशारा प्रवाशांनी अधिकाऱ्यांना दिला होता. या मुळे रेल्वे तब्बल एक तास पुणे प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर थांबली होती. या दरम्यान संतापलेल्या प्रवाशांनी झुरळांचे व्हिडिओ चित्रीकरण करत व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल केले. यामुळे रेल्वेच्या दुरावस्थेबाबत नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले.

रेल्वे प्रशासनाला याची माहिती मिळताच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आणि रेल्वे सुरक्षा दलाने या डब्यामध्ये जाऊन प्रवाशांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रवासी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर प्रवाशांनी रेल्वे कडे याबाबत लेखी मागितली. लेखी दिल्यानंतर ही गाडी नांदेडच्या दिशेने रवाना झाली. त्यावेळी रेल्वे प्रशासनाने या डब्यामध्ये एक स्वच्छता कर्मचारी, एक इंजिनियर पाठवून दिले आणि नांदेड स्थानकावर हा डब्बा रिप्लेस करण्यासंदर्भात किंवा पेस्ट कंट्रोल करण्यासंदर्भात कर्मचाऱ्यांना सांगितले.

पनवेल नांदेड एक्स्प्रेस पुणे स्थानकावर सायंकाळी ७.१५ मिनिटांनी पोहोचली होती. प्रवाशांनी वातानुकूलित डब्यातील झुरळांच्या त्रासाला कंटाळून रेल्वे रोखून धरली. त्यानंतर ८.४३ मिनिटांनी रेल्वे मार्गस्थ झाली. लक्ष्मीनारायण शर्मा थ्री टियर एसी कोचमधून प्रवास करत होते. त्यांनी सोशल मीडियावर ट्रेन क्रमांक १७६१३ पनवेल नांदेड एक्स्प्रेसमध्ये थ्री टियर एसी डब्यात झुरळं असल्याचं ट्विट केलं. एका प्रवाशाच्या जेवणात देखील झुरळ पडल्याचा दावा देखील शर्मा यानं केला.

विभागीय वाणिज्यिक व्यवस्थापक आणि पुणे रेल्वे स्थानकाचे जनसंपर्क अधिकारी रामदास भिसे यांनी पनवेल नांदेड एक्स्प्रेसच्या बी १ डब्यातून तक्रार मिळाल्याचं म्हटलं. ही एक्स्प्रेस पुण्यात ७.२५ मिनिटांनी पोहोचते. पण, त्यापूर्वी ट्रेन दाखल झाली होती. ट्रेन पोहोचताच काही कर्मचाऱ्यांनी स्वच्छता सुरु केली होती. मात्र, प्रवाशांना डबा बदलून हवा होता, असं ते म्हणाले. त्यानंतर कुर्डूवाडी स्थानकापर्यंत स्वच्छतेचं काम करण्यात येत होतं, असं देखील भिसे यांनी म्हटलं. ही एक्स्प्रेस दक्षिण मध्य रेल्वे विभागाची असून त्यांना कळवल्याचं भिसे म्हणाले.