ग्रामपंचायत निवडणूक निकाल; अंबरनाथमध्ये मनसेला घवघवीत यश
बातमी महाराष्ट्र

ग्रामपंचायत निवडणूक निकाल; अंबरनाथमध्ये मनसेला घवघवीत यश

मुंबई : राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज हाती येणार आहे. याच दरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. अंबरनाथ तालुक्यातील काकोळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा या युतीच्या पॅनलचा पराभव करीत मनसेच्या पॅनेलने वर्चस्व निर्माण केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काकोळी ग्रामपंचायतीची निवडणूक ही सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची होती. या ग्रामपंचायतीवर एकूण सात सदस्यांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. त्यातील मनसेचे नरेश गायकर, सुरेखा गायकर, रेश्मा गायकर आणि जयश्री गायकर यांनी विजय मिळवत ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फडकवला आहे. तसेच रत्नागिरीच्या दापोलीतही मनसेला यश हाती आले आहे. दापोलीतील नवशी ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचे उपतालुकाध्यक्ष मिलिंद गोरीवले यांचा विजय झाला आहे.

दरम्यान, शेवटच्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी मिळण्यास रात्री उशिर होणार आहे; परंतु शेवटच्या दीड तासात म्हणजे ५.३० वाजेपर्यंत साडेचार ते पाच टक्क्यांच्या अंदाजासह जिल्हाभरात ८० टक्के मतदानाचा अंदाज तहलीलदार राजेंद्र तवटे यांनी व्यक्त केला. ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी दोन लाख ५० हजार १६८ जणांना मतदानाचा हक्क मिळाला होता. यात एक लाख ३१ हजार ९१६ पुरुषांसह एक लाख १८ हजार २५० महिला मतदार होते. या मतदानापैकी ८० टक्के मतदान झाल्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला.