विद्यार्थ्यांनो ४ झाडे लावून संगोपन करा, अन्यथा पदवी प्रमाणपत्र मिळणार नाही
बातमी मराठवाडा

विद्यार्थ्यांनो ४ झाडे लावून संगोपन करा, अन्यथा पदवी प्रमाणपत्र मिळणार नाही

नांदेड:पदवी प्रमाणपत्र पाहिजे असेल तर विद्यार्थ्यांना चार झाडे लावून त्याचे संवर्धन करणे अनिवार्य करण्यात आले आहे.पर्यवरणाची जणजागृती तसेच पर्यावरण संवर्धनासाठी नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने हा अनोखा निर्णय घेतला आहे. या बाबत विद्यापीठाने परीपत्रक काढले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत नांदेड,लातूर,परभणी आणि हिंगोली हे चार जिल्हे येतात. विद्यापीठाशी संलग्नित चारही जिल्ह्यातील सर्व महविद्यालयाना हा निर्णय लागू करण्यात आलाय. विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाची एक बैठक नुकतीच पार पडली. विद्यार्थ्यांनी प्रति वर्ष किमान चार झाडे लावावी आणि त्याचे संवर्धन करावे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र मिळणार नाही, असे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ.मल्लिकार्जुन करजगी यांनी कळविले आहे. दरम्यान विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालया या बाबत पत्र देखील पाठवण्यात आले आहे.सर्व महाविद्यालयातील जवळपास १० टक्के विद्यार्थ्यांनी झाडे लावली देखील आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले यांनी दिली.

वृक्ष लागवडीची अशी राहणार प्रक्रिया

महाविद्यालयाने स्वातंत्र्य कक्ष स्थापन करून विद्यार्थ्यांना गुगल फॉर्मद्वारे लिंक तयार करून देण्यात यावी. त्या लिंकमध्ये विद्यार्थ्यांचे नाव, महाविद्यालयाचे नाव, मोबाईल नंबर, कोणते झाड कुठे लावले याचा तपशील द्यावा.विद्यार्थ्यांनी लावलेल्या झाडांचा जिओ टॅग फोटो जेपीजी किंवा पीडीएफ मध्ये काढून दिलेल्या लिंकवर अपलोड करण्यास सांगावा. जिओ टॅग फोटो घेतल्यामुळे त्यावर दिनांक, स्थळ व वेळ कळेल. सदर वृक्षारोपण १ ऑगस्ट ते ३० ऑक्टोबर दरम्यान करण्यात यावे.

वृक्षरोपण घर, परिसर, मंदिर, रस्त्याच्या बाजूला, स्वतःच्या शेतात किंवा अन्य ठिकाणी करण्यात यावे. दर महिन्याच्या ५ ते १० तारखेच्या दरम्यान झाडांचा फोटो अपलोड करण्यात यावा. जेणेकरून झाडांची देखभाल व्यवस्थित होत आहे की नाही हे कळेल. झाडे लावताना प्रामुख्याने वड, पिंपळ, कडुलिंब, अर्जुन, बकुळ, हेळा, भावा, करंज, आकाश मोगरा, चिंच किंवा इतर कोणत्याही फळांची झाडे लावण्यात यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.