मोठी बातमी : रोहित शर्मासह भारताचे महत्वाचे पाच खेळाडू आयसोलेशनमध्ये
क्रीडा

मोठी बातमी : रोहित शर्मासह भारताचे महत्वाचे पाच खेळाडू आयसोलेशनमध्ये

मेलबर्न : ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या रोहित शर्माही आपला क्वारंटाइन कालावधी संपवत ३० डिसेंबरला संघात दाखल झाला. रोहित मेलबर्नमध्ये दाखल झाला आणि त्याने टीम इंडियातील आपल्या सहकाऱ्यांची आणि इतर सदस्यांची गळाभेट घेतली. त्यानंतर उर्वरित दोन सामन्यांसाठी त्याला संघाचा उपकर्णधार करण्यात आलं. पण एका महत्त्वाच्या कारणामुळे रोहित शर्मासह भारताच्या पाच क्रिकेटपटूंना पुन्हा एकदा विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मेलबर्नमध्ये एका हॉटेलात या पाच खेळाडूंनी जेवण केलं. एका चाहत्याने त्यांचे बिल भरलं. चाहत्याने खेळाडूंकडून पैसे घेण्यास नकार दिल्यानंतर या खेळाडूंनी त्याच्यासोबत सेल्फी काढला आणि धन्यवाद दिले. घडलेला प्रकार आणि व्हिडीओ त्या चाहत्याने ट्विट केला. या सर्व खेळाडूंनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केल्याचंही या चाहत्याने सांगितलं. मात्र बायो-बबलचे उल्लंघन केल्याचा संशय असल्याने रोहित शर्मा, ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, नवदीप सैनी आणि शुबमन गिल या पाच खेळाडूंना पुन्हा एकदा विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.

भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया संघ जिथे वास्तव्यास आहे, तेथून या पाच जणांना वेगळ्या ठिकाणी विलग करण्यात आले आहे. कोरोना संदर्भातील नियमावली लक्षात घेता इतर भारतीय आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने या खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात आलं असून या पाच खेळाडूंना सामन्यासाठी सराव करण्याची मुभा देण्यात आली आहे, अशी माहिती ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने शनिवारी रात्री दिली आहे.