ऐतिहासिक विजयाने कोहलीच्या नावावर विराट विक्रमाची नोंद
क्रीडा

ऐतिहासिक विजयाने कोहलीच्या नावावर विराट विक्रमाची नोंद

लॉर्ड्स : दुसऱ्या कसोटीत भारताने इतिहास रचत इंग्लंडवर १५१ धावांनी विजय मिळवला. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर भारतीय संघाने कसोटीत इंग्लंडला पराभूत करण्याची ही तिसरीच वेळ आहे. महेंद्रसिंह धोनीच्या धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०१४ मध्ये लॉर्ड्सवर शेवटच्या वेळी ९५ धावांनी विजय मिळवला होता. यापूर्वी भारताने १९८६मध्ये लॉर्ड्सवर प्रथमच विजय मिळवला होता. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली लॉर्ड्सवर भारत जिंकला. आता विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने लॉर्ड्सवर जिंकून इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवरील विजय हा भारतीय कर्णधार कोहलीचा ३७वा विजय होता. हा सामना जिंकण्याबरोबरच त्याने अनेक दिग्गज कर्णधारांना मागे टाकले आणि जगात सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या अव्वल चार कर्णधारांच्या यादीत नाव मिळवले. कोहलीने कसोटी विजयांच्या बाबतीत वेस्ट इंडिजचे दिग्गज कर्णधार क्लाइव लॉयड यांना मागे टाकले आहे. लॉयड यांनी कसोटीत ३६ विजय मिळवले होते. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथने कसोटीत कर्णधार म्हणून ५३ विजय मिळवले आहेत. या यादीत ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंगचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने एकूण ४८ कसोटी विजय नोंदवले आहेत. ऑस्ट्रेलियाचा स्टीव वॉ ४१ विजयांसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारतीय कर्णधार कोहली ३७ विजयांसह चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

विराट कोहलीने सर्वाधिक कसोटी विजय मिळवणाऱ्या भारतीय कर्णधारांना मागे टाकले आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने ६० कसोटीत २७ विजय मिळवले होते. सौरव गांगुलीने ४९ कसोटींचे नेतृत्व केले आणि २१ सामने जिंकले. मोहम्मद अझरुद्दीनने ४७ कसोटीत १४ विजय मिळवले होते.