भारत आणि इंग्लंडचा सामना आता नेमका किती वाजता सुरु होणार, जाणून घ्या योग्य वेळ
क्रीडा

भारत आणि इंग्लंडचा सामना आता नेमका किती वाजता सुरु होणार, जाणून घ्या योग्य वेळ

अॅडलेड : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा सेमी फायनलचा सामना आता गुरुवारी खेळवण्यात येणार आहे. हा सामना आता नेमका किती वाजता सुरु होणार आहे, याचे अपडेट्स आता समोर आले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारताने गुणतालिकेत अव्वल स्थान राखले होते, तर इंग्लंड त्यांच्या गटात दुसऱ्या स्थानावर होता. त्यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये आता सेमी फायनलचा दुसरा सामना होणार आहे. बुधवारी पहिला सेमी फायनलचा सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये झाला. या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला आणि त्यांनी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता भारताचा सामना नेमका किती वाजता सुरु होणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना अॅडलेडच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. हा सामना सुरु करण्यापूर्वी दोन्ही पंच मैदानात दुपारी १२.०० वाजता येतील आणि मैदानाची पाहणी करतील. जर पाऊस पडला असेल तर मैदान कधीपर्यंत सुकवण्यात येईल, याचा ते पहिल्यांदा अंदाज घेतील आणि मैदानातील क्युरेटरशी ते संवाद साधतील. पण जर पाऊस पडला नाही तर ते मैदानाची पाहणी करतील. त्यानंतर दोन्ही संघांचे कर्णधार हे टॉससाठी मैदानात येतील. टॉस झाल्यावर दोन्ही संघ आपले संघ जाहीर करतील. त्यानंतर जवळपास २० मिनिटांचा ब्रेक खेळाडूंना तयारी करण्यासाठी दिला जाईल. त्यानंतर दोन्ही संघांतील खेळाडू मैदानात उतरतील ते राष्ट्रगीतासाठी. दोन्ही देशांच्या राष्ट्रगीतांची धुन वाजवली जाईल आणि त्यानंतर दोन्ही संघांतील खेळाडू खेळण्यासाठी सज्ज होतील. त्यामुळे जर पाऊस पडला नाही तर हा सामना दुपारी. १.३० वाजता सुरु होणार आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याची सर्वांना उत्सुकता आहे. कारण एकिकडे पाकिस्तानने उपांत्य फेरीचा सामना जिंकला आहे. त्यामुळे आता भारत जिंकला तर फायनलमध्ये जोरदार रंगत येऊ शकते. कारण भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ फायनलमध्ये २००७नंतर पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळतील. त्यामुळे भारत उपांत्य फेरीचा सामना जिंकतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.