मराठमोळ्या शार्दुलने मिळवलं कपिल देव, इरफान पठाण यांच्या पंगतीत स्थान
क्रीडा

मराठमोळ्या शार्दुलने मिळवलं कपिल देव, इरफान पठाण यांच्या पंगतीत स्थान

ब्रिस्बेन : चौथ्या कसोटीत चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या शेपटाला गुंडाळण्यात मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनी मोलाचा वाटा उचलला. शार्दुलने अष्टपैलू कामगिरी करत कपिल देव आणि इरफान पठाण यांसारख्या दिग्गजांच्या पंगतीत स्थान पटकावले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या डावात शार्दुलने ९४ धावा देत ३ बळी टिपले होते. त्यानंतर त्याने दुसऱ्या डावात ६१ धावा देत ४ बळी टिपण्याची कामगिरी केली. तसेच फलंदाजी करताना आपल्या दुसऱ्याच कसोटीत त्याने दमदार अर्धशतक ठोकलं. त्याने ९ चौकार आणि २ षटकार लगावत ६७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियामध्ये एकाच सामन्यात ५ पेक्षा जास्त बळी आणि ५० पेक्षा जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत शार्दुलला स्थान मिळाले. या यादीत भारताचा माजी कर्णधार कपिल देव आणि इरफान पठाण यांचाही समावेश आहे.

याशिवाय, ६० किंवा त्यापेक्षा जास्त धावा, ७ किंवा त्यापेक्षा जास्त बळी आणि २ किंवा त्यापेक्षा जास्त झेल टिपणारा शार्दुल हा एकमेव भारतीय खेळाडू ठरला. त्याच्या व्यतिरिक्त आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही भारतीयाला हा पराक्रम करता आलेला नाही. दरम्यान, पहिल्या डावात ३३ धावांची आघाडी घेतल्यावर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २९४वर आटोपला.