कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा नवा कार्यक्रम घोषित; नव्या तारखा जाहीर
क्रीडा

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा नवा कार्यक्रम घोषित; नव्या तारखा जाहीर

नवी दिल्ली : २०१९च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर कसोटी अजिंक्य स्पर्धा सुरू करण्यात आली. या स्पर्धेची रूपरेषा जाहीर करतानाच स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर १० ते १४ जून या दरम्यान खेळला जाणार असल्याचं सांगण्यात आलं होते. पण आयसीसीने आता अंतिम सामना पुढे ढकलला असून नव्या तारखा जाहीर केल्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आयसीसीच्या महत्त्वाकांक्षी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडच्या लॉर्ड्सवरच होणार आहे. पण नव्याने मिळालेल्या माहितीनुसार हा सामना १० ते १४ जूनऐवजी आता १८ ते २२ जून या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. आयपीएल २०२१चं आयोजन एप्रिल-मे या दरम्यान केलं जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बीसीसीआच्या विनंतीला मान देत आयसीसीने अंतिम सामन्यांच्या तारखांमध्ये बदल केला असल्याची चर्चा आहे.

नव्या नियमांनुसार हल्ली एका देशातून दुसऱ्या देशात क्रिकेट खेळण्यासाठी गेल्यास क्वारंटाइनचा नियम लागू होतो. ७ ते १४ असा विविध ठिकाणी हा कालावधी वेगवेगळा असतो. तसेच आयपीएल स्पर्धेत पाकिस्तान वगळता इतर सर्व देशांचे खेळाडू खेळतात. त्यामुळे कोणतेही दोन संघ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पोहोचले तरी त्या संघातील खेळाडूंना क्वारंटाइन आणि सरावाला पुरेसा वेळ मिळावा या उद्देशाने अंतिम सामना पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार आयसीसीने अंतिम सामना पुढे ढकलला आहे.