बीडच्या वाघाची राष्ट्रीय विक्रमाला गवसणी; अविनाश साबळेला सुवर्ण
क्रीडा

बीडच्या वाघाची राष्ट्रीय विक्रमाला गवसणी; अविनाश साबळेला सुवर्ण

पातियाळा : पतियाळा येथे सुरू असलेल्या फेडरेशन चषक वरिष्ठ राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्रातील बीडच्या अविनाश साबळे आणि सर्वेश कुशारे यांनी सुवर्णपदकांची कमाई केली, तर कोमल जगदाळेने रौप्यपदक पटकावले. अविनाशने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये राष्ट्रीय विक्रमही नोंदवला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

२६ वर्षीय अविनाशने ८ मिनिटे २०.२० सेकंद अशी वेळ नोंदवताना २०१९मधील स्वत:चाच ८ मि. २१.३७ से. वेळेचा विक्रम मोडीत काढला. राजस्थानच्या शंकर लाल स्वामीने रौप्य व हरयाणाच्या राजकुमारने कांस्यपदक मिळवले. महिलांच्या ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये कोमलने १० मिनिटे ०५.४३ सेकंदांची वेळ नोंदवताना दुसरा क्रमांक मिळवला.

पहिला क्रमांक उत्तर प्रदेशच्या परूल चौधरीने मिळवला. उंच उडी स्पर्धेत सर्वेशने (२.१५ मीटर) सुवर्णपदक मिळवले. तमिळनाडूच्या आदर्श रामला (२.१० मीटर) रौप्यदक मिळाले. भालाफेक स्पर्धेत हरयाणाच्या नीरज चोप्राने (८७.८० मी.) सुवर्णपदकाची कमाई करताना नवा स्पर्धाविक्रम केला.