आधी पाक आता लंका! फक्त ६ चेंडू करतायत भारताचा घात, वाचा काय घडलं
क्रीडा

आधी पाक आता लंका! फक्त ६ चेंडू करतायत भारताचा घात, वाचा काय घडलं

दुबई: सर्वाधिक आशिया कपच्या जेतेपद पटकावणारा भारतीय संघ यंदा मात्र या स्पर्धेतून बाहेर होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. सुपर फोरच्या सामन्यांमध्ये पाकिस्तान आणि त्यानंतर श्रीलंकेकडून पराभूत केल्यानंतर टीम इंडियाला आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचणे खूप कठीण होऊन बसले आहे. दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाचा शेवटच्या षटकात पराभव झाला. पाकिस्तान असो वा श्रीलंका, टीम इंडियासाठी गोलंदाजी करताना १९ वे षटक खूपच घातक ठरले आणि हे काम भुवनेश्वर कुमार या मुख्य गोलंदाजाने केले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

टी २० सामन्यांमध्ये, जेव्हा तुम्ही समोरच्या संघाला लक्ष्य गाठण्यापासून अडवत असता, तेव्हा शेवटचे षटक खूप महत्त्वाचे असते. विशेषत: १९ वे षटक, कारण येथे दबाव निर्माण करणे किंवा माघार घेणे हे शेवटच्या षटकाची दिशा ठरवते. दोन्ही सामन्यांमध्ये भुवनेश्वर कुमारने भारतासाठी १९ वे षटक टाकले आणि दोन्ही षटकात फलंदाजांनी त्याचा चांगलाच समाचार घेतला, त्यानंतर टीम इंडियाला सामन्यात पुनरागमन करणे खूप कठीण झाले.

पाकिस्तान फलंदाजांनी भुवीचा समाचार घेतला

टीम इंडियाविरुद्ध पाकिस्तानला शेवटच्या दोन षटकात २६ धावांची गरज होती, त्यावेळेस भुवनेश्वर कुमारने १९ वे षटक टाकले. मात्र या षटकात त्याने १९ धावा जणू आंदण म्हणून दिल्या, त्यानंतर पाकिस्तानचा विजय जवळपास निश्चित झाला. नंतर अर्शदीप सिंगने २० वे षटक केले, ज्यामध्ये शेवटच्या षटकात ७ धावा वाचवण्याचे त्याचे लक्ष्य होते, त्याने प्रयत्न केला, परंतु त्याला यश आले नाही.

श्रीलंकेविरुद्धही सारखीच चूक

जेव्हा शेवटच्या दोन षटकांत श्रीलंकेला विजयासाठी २१ धावांची गरज होती तेव्हा मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध देखील असाच काहीसा प्रकार घडला. त्यावेळेस देखील रोहित शर्माने भुवनेश्वर कुमारला १९ वे षटक दिले, ज्यात त्याने १४ धावा दिल्या. यावेळेस भुवनेश्वरने अतिरिक्त धावा दिल्या, त्यानंतर अर्शदीप सिंगने २० वे षटक टाकले आणि तो या सामन्यात देखील तो ७ धावा वाचवू शकला नाही.

भुवनेश्वरचे षटके : १, १, १ (वाइड), १ (वाइड), ४, ४, १, १

आशिया कपमध्ये भुवनेश्वर कुमार:
• विरुद्ध पाकिस्तान- २६/४
• विरुद्ध हाँगकाँग- १५
• विरुद्ध पाकिस्तान- ४०/१
• विरुद्ध श्रीलंका – ३०/०

श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाला आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचणे कठीण झाले आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना १७३ धावा केल्या, कर्णधार रोहित शर्माने ७२ धावांची दमदार खेळी केली. पण श्रीलंकेच्या उत्कृष्ट सलामीच्या जोडीने टीम इंडियाची अवस्था बिकट केली, मध्येच काही काळासाठी टीम इंडिया सामन्यात परतली. पण शेवटी श्रीलंकेने ६ विकेट्सने विजय मिळवला.

आशिया कपमध्ये भारतीय संघ
• पाकिस्तानचा ५ गडी राखून विजय मिळवला
• हाँगकाँगवर ४० धावांनी विजय
• पाकिस्तानकडून ५ गडी राखून पराभव
• श्रीलंकेकडून ६ गडी राखून पराभव