कोरोनाचा विस्फोट; देशात पहिल्यांदाच लाखांहून अधिक रुग्णांची नोंद
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाचा विस्फोट; देशात पहिल्यांदाच लाखांहून अधिक रुग्णांची नोंद

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होताना दिसत नाही. सलग तिसऱ्या दिवशी देशात कोरोनाचा विस्फोट झाला असून देशात पहिल्यांदाच नव्या रुग्णांची संख्या एक लाखाच्या पार गेली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत १६ सप्टेंबर २०२० रोजी देशात एका दिवसांतील आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद झाली होती. रुग्णसंख्येचा हा विक्रमही सोमवारी समोर आलेल्या आकडेवारीने मोडीत काढला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गेल्या २४ तासांत आढळून आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या, मृत्यू आणि लसीकरण झालेल्या नागरिकांची आकडेवारी जाहीर केली आहे. रविवारी दिवसभरात देशात १ लाख ३ हजार ५५८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर ५२ हजार ८४७ जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. या २४ तासांच्या कालावधीत देशात ४७८ म्हणजे जवळपास ५०० जणांचा मृत्यू झाला असून, देशात आतापर्यंत १ लाख ६५ हजार १०१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत देशात सर्वाधिक ९७ हजार ८९४ रुग्ण आढळून आले होते. १६ सप्टेंबर २०२० रोजी या विक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली होती. देशात कोरोनाचा सर्वाधिक संक्रमणाचा काळ असताना ही नोंद झाली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र संसर्गाचा वेग प्रचंड वाढला आहे. कुटुंबातील एका व्यक्तीला संक्रमण झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबालाच विषाणूची लागण होत असल्याचं आढळून आलं आहे.