सेरो सर्व्हेमध्ये ५० टक्के बालकांत आढळल्या कोरोनाच्या अँटिबॉडीज
बातमी महाराष्ट्र

सेरो सर्व्हेमध्ये ५० टक्के बालकांत आढळल्या कोरोनाच्या अँटिबॉडीज

मुंबई : एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या कमी होण्याचा ट्रेंड दिसत असताना दुसरीकडे देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे. कोरोनाच्या Delta आणि Delta Plus या व्हेरिएंट्समुळे देखील सरकारची, प्रशासनाची आणि सामान्य जनतेची चिंता वाढली आहे. मुंबईत अजूनही कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आलेली नसताना एक नवी चिंताजनक माहिती समोर आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुंबईत करण्यात आलेल्या सेरो सर्वेमध्ये शहरातल्या तब्बल ५० टक्क्यांहून जास्त लहान बालकांमध्ये करोनाच्या अँटिबॉडीज सापडल्या असल्याचा निष्कर्ष निघाला आहे. यासोबतच याआधी करण्यात आलेल्या सर्वेपेक्षा आत्ताच्या सेरो सर्वेमध्ये मुंबईतल्या लहान मुलांमध्ये कोरोना अँटिबॉडीज सापडण्याचं प्रमाण वाढल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील महापालिकेच्या नायर रुग्णालय आणि कस्तुरबा मोलेक्युलर डायग्नोस्टिक्स लॅबोरेटरी यांच्यामार्फत हा सर्वे करण्यात आला होता. लहान मुलांमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अधिक असल्याची मतं अनेक तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहेत.

कसा झाला सेरो सर्वे?
या सेरो सर्वेसाठी मुंबईच्या सर्व २४ वॉर्डमध्ये मिळून एकूण २ हजार १७६ नमुने गोळा करण्यात आले. यासाठी आपली चिकित्सा नेटवर्क आणि पालिकेच्या नायर हॉस्पिटलमधून १ हजार २८३ तर ८९३ नमुने हे दोन खासगी प्रयोगशाळांमधून गोळा करण्यात आले आहेत. १ एप्रिल २०२१ ते १५ जून २०२१ दरम्यान हा सर्वे करण्यात आला आहे.

काय आहेत निष्कर्ष?
सेरो सर्वेच्या निष्कर्षांनुसार, मुंबईतल्या आरोग्य व्यवस्थेअंतर्गत असलेल्या ५० टक्क्यांहून जास्त बालकांना याआधीच कोरोनाची लागण होऊन गेली आहे. पेडियाट्रिक श्रेणीमध्ये येणाऱ्या सर्व वयोगटातील मुलांमध्ये सरासरी सेरो पॉझिटिव्हिटी रेट तब्बल ५१.१८ टक्के इतका आढळून आला. त्यापैकी सार्वजनिक क्षेत्रातील प्रमाण ५४.३६ टक्के तर खासगी क्षेत्रातील मुलांचं प्रमाण ४७.०३ टक्के इतकं नोंदवण्यात आलं आहे.