दिलासादायक ! महाराष्ट्राला केंद्राकडून होणार रेमडेसिवीरचा जादा पुरवठा
देश बातमी

दिलासादायक ! महाराष्ट्राला केंद्राकडून होणार रेमडेसिवीरचा जादा पुरवठा

नवी दिल्ली : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची जास्त असलेली संख्या आणि रेमडेसिवीर मिळण्यावरून रुग्णांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाची दखल घेत केंद्र सरकारने महाराष्ट्राला रेमडेसिवीरचा वाढीव साठा मंजूर केला आहे. २१ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत राज्याला ४ लाख ३५,००० रेमडेसिवीर देण्यात येणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जागोजागी औषध विक्रेत्यांच्या दुकानाबाहेर रेमडेसिवीरसाठी रांगा लागायच्या. रेमडेसिवीर मिळत नाही म्हणून लोकांचा संताप वाढायला लागल्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून रेमडेसिवीरचे वाटप करण्याचे आदेश सरकारने काढले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबरच्या बैठकीत महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजन व रेमडेसिवीर मिळावे अशी मागणी केली. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशभरातील रेमडेसिवीर उत्पादनाचा आढावा घेऊन महाराष्ट्राला वाढीव रेमडेसिवीर देण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबतचे पत्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव नवदीप रिनवा यांनी २४ एप्रिल रोजी राज्य सरकारला पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, यापूर्वी महाराष्ट्राला रेमडेसिवीरचा जो साठा देण्याचा निर्णय घेतला होता त्याचा नव्याने आढावा घेतला असून महाराष्ट्राला ४ लाख ३५,००० हजार रेमडेसिवीर देण्यास मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी महाराष्ट्राला २ लाख ५९ हजार २०० रेमडेसिवीर मंजूर केले होते.

कोणाला किती मिळणार रेमडेसिव्हिर
गुजरात – १,६५,०००
उत्तर प्रदेश – १,६१,०००
दिल्ली – ७२,०००
कर्नाटक – १,२२,०००
बिहार ४०,०००
आंध्र प्रदेश – ६०,०००
राजस्थान – ६७,०००
तामिळनाडू – ५९,०००
मध्य प्रदेश – ९५,०००