राज्यात ओमिक्रॉनची चिंता वाढत असताना पुण्यातून आली पॉझिटिव्ह बातमी
पुणे बातमी

राज्यात ओमिक्रॉनची चिंता वाढत असताना पुण्यातून आली पॉझिटिव्ह बातमी

राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटची (Omicron Variant) भीती वाढत असताना पुणे (Pune) जिल्ह्यातून अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. परदेशातून पुणे जिल्ह्यात आलेल्या व ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळलेल्या सात रुग्णांपैकी पाच रुग्णांनी ओमिक्रॉनवर मात केली आहे. त्यांचे नवे टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे अजित पवार यांनी आज जिल्ह्यातील कोविड स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही महत्त्वाची माहिती दिली. ओमिक्रॉन बाधित आढळलेले सात पैकी पाच जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं. असं असलं तरी प्रशासन सज्ज असून परदेशातून आलेल्या इतर नागरिकांचाही शोध घेतला जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

देशात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळू लागल्यानंतर सर्वत्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. राज्यात कल्याण-डोंबिवलीमध्ये ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सुद्धा सात जण पॉझिटिव्ह आले होते. फिनलंडवरून पुण्यात आलेल्या रुग्णाला २९ नोव्हेंबरला ताप आल्यावर त्याची चाचणी करण्यात आली होती. त्याचा टेस्ट रिपोर्ट ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आला होता. उपचारानंतर त्याचा निगेटिव्ह आला असून त्याला दहा दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा २४ नोव्हेंबर रोजी नायजेरिया येथून एक ४४ वर्षीय महिला तिच्या भावाला भेटण्यास आली होती. तिच्या सोबत आलेल्या दोन मुली, तिचा भाऊ आणि भावाच्या दोन मुली असे एकूण सहा जण ओमिक्रॉन व्हेरिएंट बाधित असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळं जिल्ह्यात चिंतेचं वातावरण होतं. मात्र, या रुग्णांनी ओमिक्रॉनवर मात केल्यामुळं सर्वांनाचा दिलासा मिळाला आहे. सध्या राज्यात मुंबईत दोन आणि पिंपरी-चिंचवड इथं दोन ओमिक्रॉन बाधित रुग्ण उपचार घेत आहेत.

या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. ‘लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांना ओमिक्रॉनचा धोका कमी आहे आणि म्हणूनच सर्वांनी दुसरा डोस घ्यावा, असं त्यांनी म्हटलं आहे. दुसरा डोस न घेतल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.