काही तासांत मुंबईसह कोकण पट्ट्यात मुसळधार पावसाची शक्यता
बातमी मुंबई

काही तासांत मुंबईसह कोकण पट्ट्यात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : पावसाने मंगळवारी कोकण, मराठवाड्यासह नगर आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत जोरदार हजेरी लावली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाने पुनरागमन केले आहे. मुंबई, कोकणासह मराठवाड्यात बुधवारी मुसळधारांचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पुढील काही तासांमध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत वेगळ्या ठिकाणी मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता आहे. काही भागात वादळी वाऱ्यासोबत मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट देखील होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पालघर, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांच्या काही भागांवर तीव्र ढग जमा झाल्याने मुंबईसह उपनगरे, अलिबाग, ठाणे, माथेरान, कल्याण येथे मुसळधार पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.

मंगळवारी सांताक्रूझ येथे सकाळी ८.३० ते सायं. ५.३० या वेळेत ७८.४ तर कुलाबा येथे ३२.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर सोमवारी सकाळी ८.३० ते मंगळवारी सकाळी ८.३०पर्यंत सांताक्रूझ येथे ४९ तर कुलाबा येथे २९.८ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. सोमवारी मध्यम स्वरुपाच्या पावसानंतर रात्री पावसाचा जोर वाढला होता. कर्नाटकच्या वर असलेले पूर्व-पश्चिम वाऱ्याचे क्षेत्र मंगळवारी चक्रीय वात स्थितीत परावर्तित झाले. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथील पावसाचा जोर वाढल्याचे, प्रादेशिक हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.