कुणालाही जमला नाही असा रेकॉर्ड आज सूर्यकुमार यादव करणार, भुवी-रिषभही विक्रमाच्या उंबरठ्यावर
क्रीडा

कुणालाही जमला नाही असा रेकॉर्ड आज सूर्यकुमार यादव करणार, भुवी-रिषभही विक्रमाच्या उंबरठ्यावर

मुंबई : भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी ट्वेन्टी सामन्यादिवशी वरुणराजाच्या हजेरीने सामना रद्द झाल्यानंतर सर्वांनाच प्रतिक्षा आहे ती रविवारी होणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामन्याची. ‘बे ओव्हल’ मैदानात खेळपट्टीपेक्षा वातावरण भारतासाठी त्रासदायक ठरू शकते. या मैदानात जोरदार वारे वाहतात आणि त्याचबरोबर वातावरण थंड असते. या वातावरणाचा फटका भारतीय संघाला चांगलाच बसू शकतो. नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात भारतीय संघ न्यूझीलंडच्या संघाशी होत हात करेल. तसेच या दौऱ्यात सिनिअर प्लेअर विराट कोहली आणि लोकेश राहुलला देखील विश्रांती दिली गेली आहे. अनुभवी खेळाडूंच्या गैरहजेरीत नव्या दमाच्या खेळाडूंना संधी दिली जाईल. शुभमन गिल, उमरान मलिक, इशान किशन आज बाह्या सरसावून तयारीत असतील. महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून ज्या सूर्यकुमार यादवची बॅट तळपते आहे, तो आज खास रेकॉर्ड करु शकतो तर ज्याचा स्वींग आणि पेस हरवला आहे तो भुवीही आज खास विक्रम आपल्या नावे नोंदवू शकतो.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आजच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने जर ३ षटकार मारले तर टी ट्वेन्टी फॉरमॅटमध्ये भारताकडून सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज म्हणून त्याची नोंद होईल. युवीने आपल्या टी ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत ७४ षटकार ठोकले आहेत. तर इकडे सूर्यकुमार यादवने आतापर्यंत ७२ षटकार मारले आहेत. आज जर तो मागील काही मॅचेसमध्ये खेळला तसं तोडफोड खेळला तर सर्वाधिक षटकार मारण्याचा खास रेकॉर्ड त्याच्या नावे नक्की असेल.

भुवीही रेकॉर्डच्या उंबरठ्यावर

आजच्या सामन्यात जर भुवनेश्वर कुमारने 4 विकेट्स घेतल्या तर तो एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनेल. सध्या, हा विश्वविक्रम सध्या आयर्लंडच्या जोशुआ लिटलच्या नावावर आहे, त्याने एका कॅलेंडर वर्षात २६ सामन्यांत ३९ बळी घेण्याचा विक्रम केला आहे. भुवनेश्वर कुमारने आतापर्यंत 30 सामन्यांत ३६ विकेट घेतल्या आहेत.

रिषभलाही रेकॉर्डची संधी

भारतीय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतलाही आजच्या सामन्यात विशेष कामगिरी करण्याची संधी आहे. जर रिषभने आजच्या दुसऱ्या टी ट्वेन्टी सामन्यात ३० धावा किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्यात यशस्वी ठरला तर तो त्याच्या टी ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत १००० धावांचा टप्पा पूर्ण करेल. असा पराक्रम करणारा तो भारताचा 11वा फलंदाजही ठरू शकतो.