ठाकरे-आंबेडकर आज एकाच मंचावर; प्रबोधनकार डॉट कॉम संकेतस्थळाचे लोकार्पण
राजकारण

ठाकरे-आंबेडकर आज एकाच मंचावर; प्रबोधनकार डॉट कॉम संकेतस्थळाचे लोकार्पण

मुंबई : प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य आणि विचार वाचकांपर्यत पोहचविणाऱ्या अद्ययावत अशा ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या लोकार्पणाच्या निमित्ताने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर रविवारी एकत्र येत आहेत. या निमित्ताने नव्या राजकीय समीकरणाची जुळवाजुळव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येणार असल्याची माहिती असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’ पाहणीच्या निमित्ताने आंबेडकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी या दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली होती. मात्र, दोघांनी भेटीतील राजकीय चर्चेचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला होता. त्याचवेळी आंबेडकर यांनी आपण भाजप किंवा जे भाजपच्या जवळ आहेत त्यांच्यासोबत जाणार नसल्याने स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर रविवारच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर काय भूमिका मांडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

साडेचार महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदार फोडत आपला गट हाच खरा शिवसेना पक्ष असल्याचा दावा केला. पक्षातील फुटीमुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. या धक्क्यातून बाहेर पडत असताना ठाकरे यांच्याकडून नवे राजकीय मित्र जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातून वंचित बहुजन आघाडीचा पर्याय समोर आला आहे. ठाकरे यांना पक्षफुटीची मोठी झळ विदर्भ आणि मराठवाड्यात बसली. या दोन्ही भागात आंबेडकर यांची निर्णायक ताकद आहे. त्यामुळे वंचित आघाडी सोबत आल्यास दोघांनाही राजकीय लाभ होऊ शकतो. नजीकच्या काळात उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू होणार किंवा कसे याचे संकेत आजच्या कार्यक्रमातून मिळू शकतात. त्यामुळे शिवसैनिक आणि वंचितच्या कार्यकर्त्यांच्या नजरा आजच्या कार्यक्रमाकडे लागल्या आहेत. या कार्यक्रमाला दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते गर्दी करण्याची शक्यता आहे. ‘ प्रबोधनकार डॉट कॉम’चा लोकार्पणाचा सोहळा संध्याकाळी साडेसात वाजता दादर पश्चिम येथील शिवाजी मंदिर येथे होत आहे. या कार्यक्रमाला प्रबोधन प्रकाशनाचे सुभाष देसाई उपस्थित राहणार आहेत.