महाराष्ट्राच्या कबड्डी संघाची निवड जाहीर
क्रीडा

महाराष्ट्राच्या कबड्डी संघाची निवड जाहीर

मुंबई : वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राची संघनिवड करण्यात आली आहे. संभाव्य १५ पैकी तिघांना वगळून शुभम शिंदेच्या नेतृत्वाखाली उर्वरित १२ खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या तिघांपैकी दोघांचा २४ तासांत केलेल्या दुसऱ्या कोरोना चाचणीचा अहवाल नकारात्मक आला असला तरी तो ग्राह्य धरणार नसल्याचे राज्य कबड्डी संघटनेने स्पष्ट केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अयोध्या येथे १३ ते १६ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या संघातून गुरुवारी कोरोना अहवाल सकारात्मक आलेल्या तिन्ही खेळाडूंना वगळण्यात आले आहे. बारामतीच्या शासकीय आरोग्य केंद्रात झालेल्या कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्यामुळे या तीन खेळाडूंना संघात स्थान न देण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागला. कारण हे खेळाडू राज्यातील उत्तम बचावपटू होते. याचप्रमाणे शनिवार-रविवारी राज्यात टाळेबंदी असल्यामुळे शुक्रवारीच प्रवेशिका भरून संघनिवड करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी दिली.

कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आलेल्या तिन्ही खेळाडूंनी आपल्या पुनर्चाचण्या केल्या. यापैकी दोघांनी अहवाल नकारात्मक आल्यानंतर संघातील स्थानासाठी दावेदारी केली. परंतु, बारामतीच्या सराव शिबिरात आलेले कोरोना अहवाल चुकीचे कसे ठरवणार, असा मुद्दा उपस्थित करीत राज्य संघटनेने खेळाडूंचे दुसरे अहवाल फेटाळण्यात आले, असे धोरण स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्राचा संघ : कर्णधार : शुभम शिंदे, अजिंक्य पवार (रत्नागिरी), पंकज मोहिते, सुशांत साईल (मुंबई शहर), सुनील दुबिले, सिद्धार्थ देसाई (नांदेड), सुधाकर कदम (पुणे), गिरीश इरनाक, निलेश साळुंखे (ठाणे), रिशांक देवडिगा (उपनगर), मयूर कदम (रायगड), दादासाहेब आव्हाड (नंदुरबार); प्रशिक्षक : प्रशांत सुर्वे, व्यवस्थापक : बजरंग परदेशी.