सोयाबीनच्या भावात दोन हजार रुपयांची घसरण; हे आहे कारण
शेती

सोयाबीनच्या भावात दोन हजार रुपयांची घसरण; हे आहे कारण

लातूर : सोयाबीन उत्पादक देशातील हवामान बदलाच्या फटक्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट होणार असल्याने सोयाबीनच्या भावात विक्रमी वाढ झाली होती. चार दिवसांपूर्वी वायदे बाजारात सोयाबीनचा भाव १० हजार ३०० रुपये होता. सोयाबीनचा भाव आठ हजार ३०० रुपये क्विंटल झाला तर वायदे बाजारातील भाव आठ हजार ४६६ रुपये इतका घसरला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भावांत घसरण होण्याचे कारण
पोल्ट्री फॉर्म असोसिएशनने देशांतर्गत सोयाबीन पेंडीचे भाव वाढल्याने विदेशातून १५ लाख टन सोयाबीन पेंड आयात करण्याचा निर्णय घेण्याची केंद्र सरकारकडे मागणी केली व या मागणीचा सरकार सकारात्मक विचार करत असल्याचे वृत्त समाजमाध्यमातून व काही वृत्तवाहिन्यांवरून सोमवारी प्रसारित झाले. त्यावर सरकारने नरो वा कुंजरोची भूमिका घेतल्याने बाजारपेठेतील सोयाबीनचे भाव दोन हजार रुपयांनी गडगडले. सोयाबीनचा भाव १० हजार रुपये क्विंटलपेक्षा अधिक झाल्याने सोयाबीन उत्पादकांत या वर्षी चांगले भाव मिळतील, अशी आशा वाढली होती. गेल्या २० दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने उत्पादनात घट होणार ही चिंता असतानाच आता सोयाबीनच्या भावात एका दिवसात दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे.

केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयात शुल्कात गेल्या महिनाभरापूर्वी तेलाच्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी कपात केली. मात्र, त्याचा लाभ होण्याऐवजी नुकसानच झाले व विदेशातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला. सार्क देशाच्या करारानुसार नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका या देशातील आयात करताना त्यावर शून्य टक्के कर आकारावा लागतो. खाद्यतेलावर ३८.५ टक्के कर आहे. तो वाचवण्यासाठी अनेक देश नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका या देशातून माल पाठवतात. कमी भावात आलेल्या तेलामुळे उर्वरित तेल विक्रेत्यांना त्याचा फटका सहन करावा लागतो आहे.