वाढदिवस विशेष; महाराष्ट्रातील एक झंझावात… गोपीनाथ मुंडे
ब्लॉग

वाढदिवस विशेष; महाराष्ट्रातील एक झंझावात… गोपीनाथ मुंडे

घार फिरते आकाशी, लक्ष तिचे पिल्लांपाशी’ ही म्हण तंतोतंत लागू होते ती दिवंगत केंद्रीय नेते गोपीनाथ मुंडे यांना. महाराष्ट्रातील एकेकाळचं घोंगावत वादळ म्हणजे गोपीनाथ मुंडे, राज्यातील भाजपाचा चेहरा म्हणजे गोपीनाथ मुंडे. अशीच त्यांची ओळख. महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचा इतिहास ज्यांच्यावर भरभरून लिहिल्याशिवाय पूर्णच होऊ शकणार नाही, असं भारदस्त व्यक्तिमत्त्व.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांचा जन्म १२ डिसेम्बर १९४९ रोजी बीड जिल्ह्यातील नाथ्रा या गावी ता. परळी, जि. बीड एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पांडुरंग मुंडे तर आईचे नाव लिंबाबाई मुंडे. गोपीनाथ मुंडेची घरची परिस्थिती बेताचीच. अशातच त्यांच्या वडिलांचे पांडुरंगरावांचे १९६९ मध्ये अकाली निधन झाले. मात्र गोपीनाथ मुंडे यांचे थोरले बंधू पंडितअण्णा मुंडेनी त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. भाऊ पंडितअण्णा यांनी स्वतःचे शिक्षण सोडून गोपीनाथ मुंडे यांनी यांचे शिक्षण पूर्ण केले.

गोपीनाथ मुण्डे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हापरिषदेच्या शाळेत तर बी. कॉम. पर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण अंबेजोगाई येथे झाले. मुंडेनी बीडच्या कॉलेजमध्ये विद्यार्थी संसदेच्या निवडणुका लढवून राजकारणाचा श्रीगणेशा केला. कॉलेजात असतांना त्यांची प्रमोद महाजन यांच्याशी मैत्री झाली आणि त्यांच्या आयुष्यालाच कलाटणी मिळाली.

राजकीय प्रवास
प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे या भाजपच्या शिलेदारांनी तब्बल २५ वर्षांपूर्वी बीड या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातूनच निवडणूक प्रचाराला प्रारंभ केला. मुंडे- महाजन या दोघांनी झंझावाती प्रचाराने उभा महाराष्ट्र ढवळून काढला होता. आधी जनसंघ आणि नंतर भाजपचा प्रचार करताना या दोघांनी पक्षाची पाळेमुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात घट्ट रूजविली होती. मुंडे-महाजन जोडगोळीने मराठवाडा, विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्र अक्षरश: पिंजून काढला होता.

१९७८मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी पहिल्यांदा अंबाजोगाई तालुक्यातील उजनी गटातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नशीब आजमावले. १९८0मध्ये ते पहिल्यांदा रेणापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर १९९0 आणि १९९५मध्येदेखील याच मतदारसंघातून ते निवडून आले.१९८0 ते ८२ दरम्यान भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद, व त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पद भूषविले. राज्यात युतीची सत्ता असताना त्यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागली. तर २00९मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. प्रमोद महाजन यांच्याबरोबरीने गोपीनाथ मुंडेंची जनसंघ ते भाजप अशी वाटचाल झाली. बीड मतदारसंघात मोटरसायकलवरून गोपीनाथ मुंडेनी भाजपचा प्रचार केला. खांद्यावर शबनम आणि मोटरसायकल अशी गोपीनाथ मुंडेंची ओळख बनली होती. त्यावेळी भाजपचे १४ उमेदवार निवडून आले.

पुढे १९८२ मध्ये ते महाराष्ट्र भाजपचे सरचिटणीस झाले. १९८५ मध्ये झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीत पराभव झाला. मुण्डे पुन्हा एकदा सचिव झाले. मात्र १९८५ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये गेवराई मतदारसंघाततील कॉंग्रेसचे पंडितराव दौंड यांनी गोपीनाथरावांचा पराभव केला. इ.स. १९८५ मधील ही हार वगळता मुंडे यांच्यावर निवडणुकीच्या आखाड्यात धूळ खाण्याचा प्रसंग आला नाही. भारतीय जनता पक्षाचे सदस्य असून त्यांनी १९८० पासून २००९ पर्यंत महाराष्ट्राच्या बीडमधील लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

दरम्यान, तत्कालीन कॉंग्रेसचे शरद पवारांच्या नेतृत्वाखालील सरकार खाली खेचण्यासाठी त्यांनी राज्यभर संघर्ष यात्रा काढून या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून त्यांनी पवार सरकारविरुद्ध वातावरण निर्माण केले. या सरकारच्या कार्यकाळात राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले आहे, असे, पुराव्यासह सिद्ध करून त्यांनी ते सरकार खाली खेचण्यासाठी संपूर्ण ताकद लावली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे हे दोन नेते पवार सरकारवर तुटून पडले होते. शिवसेना-भाजपा युतीची सत्ता आणण्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांचा फार मोठा वाटा होता. त्याचे फळही त्यांना मिळाले. ते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री झाले ते केवळ त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर. शिवसेनेने मात्र त्यांच्यावर सतत कुरघोडी करण्याचे राजकारण केल्यामुळे बऱ्याच गोष्टी त्यांना करता आल्या नाहीत, तरीदेखील गृहमंत्रीपदी त्यांनी आपली ताकद दाखवली. त्यांच्यासारखा कर्तृत्ववान आणि ताकदवान गृहमंत्री आजतागायत पुन्हा महाराष्ट्राला लाभलेला नाही.

भाजपने खासदार गोपीनाथ मुंडे यांची ११ जूलै २००९ रोजी महाराष्ट्राचे भाजप प्रभारी म्हणून नेमणूक केली. गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्राचे राजकारण मोठ्या हिमतीने केले. ते राजकारणात पुढे जायला लागले तसे त्यांचे अनेक सहकारी त्यांच्यापासून दुरावले गेले. मात्र या दुरावलेल्या लोकांमुळे गोपीनाथ मुण्डे यांच्या स्थानाला फारसा धक्का लागला नाही. ते अपयशाने खचले नाही. या दरम्यान त्यांचे वक्तृत्व, नेतृत्व अधिकच विकसित होत गेले. सातत्याने त्यांनी लोकांमध्ये मिसळून काम केले. सत्ता नसताना अनेक प्रश्‍न त्यांनी तडीस नेले. त्यांनी आपला मतदारवर्ग पक्षाच्या भिंती तोडून तयार केला. सर्व समाजातील मतदारांनी त्यांना स्वीकारले.

२०१४ मध्ये देशभरात नरेंद्र मोदी यांची तुफान लाट होती. केंद्रात २८२ जागा जिंकून भारतीय जनता पार्टी सत्तेवर आल्यावर केंद्रीय ग्रामविकास मंत्री म्हणून गोपीनाथ मुंडे यांनी शपथ घेतली. त्यानंतर काहीच महिन्यातच महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक लागणार होती. तोपर्यंत मोदी लाट ओसरण्याची सूतराम शक्यता नव्हती. म्हणजे मुंडे यांचे स्वप्न साकरणार, हे हमखास होतं. मात्र, यावेळी नियतीने अचानक घाला घातला आणि ३ जून २०१४ रोजी गोपीनाथ मुंडे यांनी जगाचा निओप घेतला. केंद्रात मंत्री असताना ‘महाराष्ट्रात परतेन तर मुख्यमंत्री होण्यासाठीच,’ असं त्यांचं गाजलेलं वक्तव्य. तेच स्वप्न उराशी बाळगून त्यांची वाटचाल सुरू होती. मात्र मुंडे महाराष्ट्रात परतलेच नाहीत. आलं ते त्यांचं पार्थिव. अनपेक्षितपणे एका लढवय्या नेत्याची अखेर झाली. मुंडेंच्या जाण्यानं महाराष्ट्राला धक्का बसला.