गोपीनाथ मुंडेच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद; यंदा हा प्रसादच गोड मानून घ्या…
राजकारण

गोपीनाथ मुंडेच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद; यंदा हा प्रसादच गोड मानून घ्या…

बीड : “कोरोनामुळे दरवर्षीप्रमाणे भोजनाच्या पंक्ती वैगेरे करता आल्या नाहीत. यंदा हा प्रसादच गोड मानून घ्या बाबांनो. हार, सत्कार, सेल्फी काही नाही, शुद्ध भावना आणि तुमची ऊर्जा हीच बस आहे.” असे ट्विट करत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्त्यांना गर्दी न करण्याचं आणि कोरोनाच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.दिवंगत केंद्रीय मंत्री आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त पंकज मुंडे यांनी शुक्रवारी (11 डिसेंबर) प्रसादाच्या पॅकिंगच्या कामाची स्वतः पाहणी केली. त्यानंतर त्यांनी ट्वीट करत कार्यकर्त्यांना कोरोनाच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्त्यांना व्हिडीओ मेसेजद्वारे आवाहन करत रक्तदान शिबिरं आयोजित करण्याचंही आवाहन केलं. “12 डिसेंबर हा आपल्या सर्वांना उर्जा देणारा दिवस आहे. गोपीनाथ मुंडे संघर्षाचं मुर्तीमंत मोठं उदाहरण होतं. आज ते आपल्यात नाही तरीही ते आपल्यासाठी संघर्षाचा महामेरु आहेत. लोकांना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देणारं ते नेतृत्व आहे. गोपीनाथ गडाच्या निर्मितीनंतर 12 डिसेंबर आणि 3 जून हे दिवस आपण वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करतो. या दिवशीच्या कार्यक्रमांना मुख्यमंत्र्यांपासून मोठमोठे नेते आणि सामाजिक क्षेत्रातील नेते उपस्थित राहिले. छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे असे दोन्ही छत्रपती गोपीनाथ गडावर आले.” असे पंकजा मुंडे यांनी म्हंटले आहे.

त्याचबरोबर, ‘मी स्वतः सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत गोपीनाथ गडावर उपस्थित राहणार आहे. आपण सर्वांनी गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहनासाठी गर्दी न करता यावं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचा कार्यक्रम व्हावा अशी कार्यकर्त्यांसह माझीही इच्छा आहे. पण महाराष्ट्रावर आणि सामान्य नागरिकांवर फार मोठं संकट आहे. त्यामुळेच कोरोनाचे नियम पाळून लोकांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घेत हा कार्यक्रम वेगळ्या पद्धतीने साजरा करणार आहोत. असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

तसेच, गोपीनाथ प्रतिष्ठानच्यावतीने 12 डिसेंबर रोजी गोपीनाथ गडावर मुंडे साहेबांची जयंती साजरी होणार आहे. पण दरवर्षीप्रमाणे मोठी सभा, मोठे नेते आणि गर्दी आपल्याला टाळायची आहे. त्यामुळे यावर्षी त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वांनी रक्तदानाचा कार्यक्रम घ्यावा. या महामारीच्या संकटाच्या काळात रक्तदानाची फार आवश्यकता आहे. त्याचा समाजाला फार मोठा उपयोग आहे. त्यामुळे 12 ते 15 डिसेंबरच्या काळात आपण सर्वांनी रक्तदान शिबिरच आयोजित करावे,” असंही आवाहन पंकजा मुंडे यांनी समर्थकांना केलं.