पोहरादेवी जगदंबाचे महंत कबिरदास यांच्यासह १९ जणांना कोरोनाची लागण
कोरोना इम्पॅक्ट

पोहरादेवी जगदंबाचे महंत कबिरदास यांच्यासह १९ जणांना कोरोनाची लागण

वाशिम : दोन दिवसांपूर्वी वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरा देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समर्थनार्थ मोठी गर्दी जमली होती. त्यावेळी ज्या गोष्टीची भीती वर्तवली जात होती ती खरी ठरली आहे. पोहरादेवी जगदंबा देवीचे महंत कबिरदास महाराज यांच्यासह एकूण 19 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. कबिरदास महाराज यांच्या कुटुंबातील तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तर काही जणांना कोरोनाची लक्षणं असल्याचीही माहिती समोर येत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

संजय राठोड यांनी 23 फेब्रुवारी रोजी प्रथम महंत कबिरदास महाराज यांची भेट घेतली होती. त्यादिवशी विविध ठिकाणहून हजारो जण पोहरादेवीत उपस्थित होते. विशेष म्हणजे कबिरदास महाराजांनी 21 तारखेला कोरोनाची टेस्ट केली होती. मात्र तरीही ते संजय राठोड पोहरादेवी येथे आले तेव्हा दिवसभर त्यांच्यासोबत होते. कबिरदास महाराज पोहरादेवी मंदिर आणि सेवालाल महाराज ट्रस्टचे अध्यक्ष आहे. मात्र आता या गर्दीतून कोरोनाचा संसर्ग झाला असल्यास संक्रमणाची मोठी भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, कोरोनाविषयक आरोग्याचे नियम सर्वांना सारखेच आहेत. कोविड काळात नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितावर प्रशासनाने कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. तर संजय राठोड यांच्या वाशिम दौऱ्यादरम्यान पोहरादेवी इथल्या गर्दीबाबत तात्काळ कारवाई करण्याचे आदेशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे प्रशासन आता काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर अडचणीत सापडलेले वनमंत्री संजय राठोड 23 फेब्रुवारी पोहरादेवी येथे दाखल झाले होते. यावेळी संजय राठोड यांच्या स्वागतासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती. येथे जमलेल्या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला होता.