दिलासादायक! देशात मागील १५१ दिवसांतील निचांकी अॅक्टिव रुग्णसंख्येची नोंद
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक! देशात मागील १५१ दिवसांतील निचांकी अॅक्टिव रुग्णसंख्येची नोंद

नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका मात्र टळलेला नाही. देशात गेल्या २४ तासांत ३४ हजार ४५७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३७५ जणांचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्णांसह देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ३ लाख ६१ हजार ३४० वर पोहोचली आहे. ही रुग्णसंख्या गेल्या १५१ दिवसांतील सर्वात कमी आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, भारतात सध्या कोरोना साथ चालू राहण्यास व नव्याने काही ठिकाणी उद्रेक होण्यास डेल्टा विषाणूच कारणीभूत आहे, त्यामुळे लशीची परिणामकारकता कमी दिसत असून विषाणूचा प्रसार वाढत आहे, असे इन्साकॉग या संस्थेने म्हटले आहे.

भारतात कोरोना विषाणूंच्या जनुकीय क्रमवारीचे काम इन्साकॉग ही संस्था करीत असून भारतात डेल्टा विषाणूचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. एकूण ३०,२३० नमुन्यांचे विश्लेषण केले असता त्यातील २०,३२४ नमुने डेल्टा विषाणूचे निघाले आहेत. भारतात एवाय १, एवाय २ एवाय ३ या डेल्टा प्लस विषाणूचे प्रकार महाराष्ट्रात जुलैमध्ये दिसून आले आहेत. त्यांचे प्रमाण एक टक्का होते. डेल्टा प्रजातीतील विषाणू आता आले असले तरी देशात डेल्टा प्लसचे ६१ नमुने आतापर्यंत सापडले आहेत.