माधुरी दीक्षितचं वेबवरही होणार जोरदार पदार्पण; दिसणार ‘या’ भूमिकेत
मनोरंजन

माधुरी दीक्षितचं वेबवरही होणार जोरदार पदार्पण; दिसणार ‘या’ भूमिकेत

मुंबई : धक-धक गर्ल माधुरी दीक्षित लवकरच वेबवर पदार्पण करणार आहे. नेटफ्लिक्सवरील आगामी वेब सीरिजमध्ये माधुरी दीक्षित एका सुपरस्टार अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. या सीरिजची निर्मिती करण जोहर करत असून ‘द अॅक्ट्रेस’ असं याचं नाव असल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. या सीरिजचं दिग्दर्शन श्री राव करणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गेल्या वर्षी माधुरी कलंक या सिनेमात दिसली होती. हा भव्यदिव्य सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणकून आपटला होता. त्यामुळे यावेळी माधुरीने आपली भूमिका आणि वेब सीरिज निवडताना विशेष दक्षता घेतल्याचं म्हटलं जात आहे. ही सीरिज एक सस्पेन्स ड्रामा असून एका सुपरस्टारच्या आयुष्याभवती फिरणारी कथा पाहायला मिळणार आहे.

विशेष म्हणजे या सीरिजमध्ये अभिनेता मकरंद देशपांडे खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं सांगण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘हंड्रेड’ या सीरिजमधील मकरंद यांची हट के भूमिका चांगलीच गाजली होती. आता माधुरी-मकरंदच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. वेब सीरिजच्या चित्रीकरणाचं पहिलं शेड्युल नुकतंच नाशिकमध्ये पूर्ण झालं आहे. येत्या महिन्यात मुंबईत चित्रीकरणाच्या दुसऱ्या शेड्यूलला सुरुवात होणार आहे.