शेतकरी आंदोलनातील अजीविषयी ट्वीट केल्याने कंगना नेटकऱ्याच्या निशाण्यावर
मनोरंजन

शेतकरी आंदोलनातील अजीविषयी ट्वीट केल्याने कंगना नेटकऱ्याच्या निशाण्यावर

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचे दिल्लीत आंदोलन सुरु आहे. आज या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस असून हे शेतकरी दिल्ली सीमेवर निषेध आंदोलन सुरु आहे. यामध्येच अभिनेत्री कंगना रणौतने एक ट्विट केलं आहे. या ट्वीटमुळे कंगनावर टीकेची झोड उठली आहे. नेटकऱ्यानी तिला चांगलेच ट्रोल केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शेतकरी आंदोलनातील एक आजी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहेत. कंगनाने या आजींची तुलना शाहीन बाग प्रकरणातील बिलकिस दादी यांच्यासोबत केली आहे. कंगनाने अलिकडेच या आजीं संदर्भातील एक ट्विट शेअर केलं होतं. मात्र कंगनाच्या या ट्वीटमुळे तिच्यावर ट्रोल होण्याची वेळ आली आहे. सोशल मीडियावर सुरु झालेल्या ट्रोलिंगनंतर कंगनाने तिचं हे ट्विट डिलीट केलं आहे. सध्या ट्विटरवर #DaadiSeMaafiMangKangana हा हॅशटॅग चांगलाच व्हायरल झाला आहे.

कंगनाने या आजीसंदर्भात ट्विट केल्यानंतर ते चुकीचं असल्याचं ऑल्ट न्यूजचे प्रतिक सिन्हा यांनी सांगितलं. तसंच त्यात करण्यात आलेले दावेदेखील खोटे आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी कंगनाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. कंगना कायमच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येत असते. यापूर्वीदेखील आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती ट्रोलर्सला सामोरी गेली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारनं कृषी क्षेत्रात सुधारणा करण्याचं जाहीर करत शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) हे कायदे पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेतले. राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर कायदे लागूही करण्यात आले आहेत. दरम्यान, केंद्राच्या या कायद्यांना देशातील काही भागातील शेतकऱ्यांकडून विरोध होताना दिसत आहे. विशेषतः पंजाब हरयाणात या कायद्याविरोधात तीव्र पडसाद उमटताना दिसत आहे.

तर दुसरीकडे, शेतकऱ्यांनी दिल्लीला घेराव घातल्यामुळे केंद्रावर दबाव वाढत चालला आहे. शेतकऱ्यांच्या आक्रमकतेमुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची मान्यता दिली आहे. ३ डिसेंबर रोजी केंद्रीय कृषीमंत्र्यांसोबत शेतकरी चर्चा करणार आहेत. आता या चर्चेतून काय तोडगा निघतो हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.