जेव्हा प्रकाश आंबेडकरांच्या एका वाक्यावर १० लाखांचा उसळलेला जनसमुदाय शांत झाला होता…!
इतिहास

जेव्हा प्रकाश आंबेडकरांच्या एका वाक्यावर १० लाखांचा उसळलेला जनसमुदाय शांत झाला होता…!

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘रिडल्स इन हिंदुइझम’ या इंग्रजी ग्रंथातील मजकूरावरून १९८७-८८ च्या दरम्यान महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला होता. या ग्रंथात रामायणाचा नायक राम आणि महाभारताचा नायक कृष्ण या दोन व्यक्तिमत्वांची कठोर तर्कशुद्ध चिकित्सा करण्यात आली होती. रामायण आणि महाभारत या दोन लोकप्रिय आर्ष महाकाव्यांचा संबंध होता. त्यामुळे ‘हिंदूधर्मातील ती कोडी’ म्हणजे संवेदनशील विषय बनला होता. या ग्रंथावर बंदी घालावी अशी मागणी काही महाराष्ट्रातील सनातनी हिंदू संघटनांनी केली होती. त्यानंतर या ग्रंथाच्या समर्थनार्थ आणि विरोधात अनेक मोर्चे-प्रतिमोर्चे, आंदोलने-प्रतिआंदोलने सुरू झाली. सामाजिक तणावही निर्माण झाला होता. यादरम्यान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतलेली होती. पण त्याचवेळी बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या भावनिक आवाहनामुळे दहा लाखांचा मोर्चा कसा शांत झाला होता? याचाच इंट्रेस्टिंग किस्सा….

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

‘रिडल्स इन हिंदुइझम’ या ग्रंथाच्या समर्थनार्थ रिपब्लिकन पक्षाने सुमारे १० लाखांचा मोर्चा काढला. अशावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही ‘सामना’मध्ये ‘रिडल्स राम आणि कृष्ण’ प्रश्नावर महाराष्ट्र पेटवू, असा मथळा छापला. साहजिक दोन्ही बाजूकडील कार्यकर्ते आक्रमक झाले. रिपब्लिकन पक्षाच्या मोर्चानंतर आणि आक्रमक भूमिकेनंतर महाराष्ट्रात मोठा गदारोळ होण्याची शक्यता होती. हीच शक्यता लक्षात घेऊन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी प्रकाश आंबेडकर यांना धीराने घेण्याची विनंती केली. दोन्हीकडूनही अशीच आक्रमक विधान येत राहिली तर यामध्ये गोरगरिबांची घरं जळतील, सामान्य लोक उघड्यावर येतील, तेव्हा आजच्या मोर्चात आक्रमक बोलण्याऐवजी सामंजस्याची भाषा वापरावी, अशी विनंती भावे यांनी प्रकाश आंबेडकर यांना केली.

प्रकाश आंबेडकरांच्या एका वाक्याने दहा लाखांचा जनसमुदाय कसा शांत झाला?

रिडल्स राम आणि कृष्ण प्रश्नावर महाराष्ट्र पेटवू या सामनातल्या मथळ्याने आंबेडकरी कार्यकर्ते पेटून उठले. आता काहीही झालं तरी माघार घ्यायची नाही म्हणत शिवसेनेविरोधात एल्गार पुकारुन दहा लाख लोक रस्त्यावर उतरले. नागपूरच्या भूमीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या मोर्चाचं आयोजन केलं गेलं. सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या भाषणाकडे लागलं.

मोर्चात दहा लाख लोक बघून पोलिसही काळजीत पडले. आता आंबेडकरांचा एक इशारा आणि महाराष्ट्रभर राड्याला सुरुवात अशी सगळी परिस्थिती होती. पण आंबेडकरांच्या मनात वेगळंच सुरु होतं. त्यांनी भाषणाला सुरुवात केली… बाळासाहेब ठाकरेंनी सामनामधून इशारा दिलाय रिडल्स राम आणि कृष्ण प्रश्नावर महाराष्ट्र पेटवू… या बाळासाहेबाची त्या बाळासाहेबांना हात जोडून विनंती आहे, या महाराष्ट्रात काही पेटवायची गरज असेल तर गरिबांची चूल पेटवण्याची गरज आहे.. चला दोघे मिळून मिळून गरिबांची पेटवू…”

आंबेडकरांनी हे शब्द उच्चारताच सुमारे दहा लाख लोकांनी टाळ्यांच्या कडकडाट केला. उसळलेला जनसमुदाय क्षणांत शांत झाला. आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण भाषणात सामंजस्याची भूमिका घेताना परखड विचाराने सभा गाजवली.

एक तळटीप आणि वाद मिटला…!

balasaheb
सर्व आंबेडकरी नेते, बाळासाहेब ठाकरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण

‘रिडल्स इन हिंदुइझम’वर बंदी घालण्याची मागणी झाल्यानंतर प्रतिकारार्थ आंबेडकरी तरुण रस्त्यावर उतरले. तसेच पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्यांचा आंबेडकरी विचारवंतांनी वैचारिक परामर्ष घेतला. त्या ऐतिहासिक लढ्याचे वैचारिक नेतृत्व राजा ढाले यांच्याकडे होते. त्यांच्या तर्कवादी भूमिकेमुळे फुले-आंबेडकरी विचारधारा मानणारी पुढची पिढी तयार झाली.

अखेर सर्व आंबेडकरी नेते, बाळासाहेब ठाकरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी एकत्रित बसून या ग्रंथात व्यक्त झालेल्या मताशी महाराष्ट्र सरकार सहमत असेलच असे नाही, अशी तळटीप टाकण्याच्या तडजोडीवर हा वाद मिटवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *