कोरोना पुन्हा पुन्हा होतो! १०१ वर्षाच्या आजीला तिसऱ्यांदा कोरोनाची लागण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोना पुन्हा पुन्हा होतो! १०१ वर्षाच्या आजीला तिसऱ्यांदा कोरोनाची लागण

रोम : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून एकदा कोरोना झाल्यास पुन्हा होतो का? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. पण त्याचे उत्तर हो आहे. कोरोना पुन्हा पुन्हा होतो. इटलीतील १०१ वर्षाच्या आजींना काही महिन्यांच्या अवधीत तिसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. याआधी दोन वेळेस आजींनी कोरोनाला मात दिली. आता तिसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली असली तरी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कुटुंबियांनी सांगितले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मारिया ऑरसिंघेर असे या आजींचे नाव आहे. जवळपास ९ महिन्यात तीन वेळेस त्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. मारिया यांना पहिल्यांदा फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यावेळी इटलीमध्ये कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातले होते. कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक वृद्धांचा मृत्यू झाला होता. मात्र, या आजींनी कोरोनासोबतची लढाई जिंकली.

आईला कोरोनाची बाधा झाल्यानंतर आम्ही खूप घाबरलो होतो. इतर वृद्धांचा मृत्यू होत असल्यामुळे आमच्या भीतीत आणखी भर पडली. मात्र, काही दिवसांत आईने कोरोनावर मात केली होती, असे त्यांची मुलगी कार्ला यांनी सांगितले. कोरोनाचे रुग्ण लवकर बरे होत नसताना आईची प्रकृती काही दिवसांत बरी झाली होती. डॉक्टरांनीही यावर आश्चर्य व्यक्त केले असल्याचे कार्ला यांनी सांगितले.

जुलै महिन्यात मारिया यांचा १०१ वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना सप्टेंबर महिन्यात पुन्हा कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात तिसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली. सध्या मारिया आजी या घरीच विश्रांती घेत असून कोरोनाची लक्षणे आढळली नाहीत. त्याशिवाय त्यांना श्वास घेण्यासही कोणताच त्रास होत नाही. त्यामुळे तिसऱ्यांदा त्या कोरोनाला परतवून लावतील असा विश्वास त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला. या आजाींनी स्पॅनिश फ्लू, दुसऱ्या महायुद्धाच्या संकटाचा काळ पाहिला आहे. त्यातूनही त्या सुखरूप बचावल्या होत्या.