४० कोटी भारतीयांना अजूनही कोरोनाचा धोका
देश बातमी

४० कोटी भारतीयांना अजूनही कोरोनाचा धोका

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली गेलेली असताना, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आज (ता. २०) चौथ्या राष्ट्रीय सेरो सर्वेचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले. यामध्ये सांगण्यात आहे की, देसभरात मुलांसह दोन तृतीयांश नागरिकांमध्ये कोरोनाविरोधातील अँटीबॉडीज विकसित झाल्याचे आढळून आले आहेत. अद्यापही जवळपास ४० कोटी भारतीयांना कोरोनाचा धोका असल्याचेही समोर आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की ६ ते १७ वयोगटातील ५० टक्क्यांहून अधिक मुलांना कोविडचा संसर्ग झाला व त्यांच्यामध्ये अँटीबॉडीज विकसित झाल्या आहेत. आयसीएमआरने चौथ्या सेरो सर्वेची आकडेवारी जाहीर केली आहे. या सर्वे जून-जुलैदरम्यान करण्यात आला होता. २८ हजार ९७५ लोकांवर केल्या गेलेल्या सर्वेत ६ ते १७ वर्षे वयोगटतील मुलांचा देखील समावेश करण्यात आला होता. सर्वेमध्ये सहभागी ६७.६ टक्के लोकांमध्ये कोविड अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत, म्हणजेच ते कोरोना संक्रमीत झाले होते.

या सर्वेमध्ये २८ हजार ९७५ लोकांना सहभागी करून घेतलं गेलं होतं. यामध्ये ६ ते ९ वर्ष वयोगटातील २ हजार ८९२ मुलं, १० ते १७ वयोगटातील ५ हजार ७९९ मुलं आणि १८ वर्षा पेक्षा जास्त वय असणाऱ्या २० हजार २८४ जणांचा समावेश होता. या सर्वेमध्ये हे देखील दिसून आले की, ६ ते ९ वर्षाच्या ५७.२टक्के आणि १० ते १७ वर्षाच्या ६१.६ टक्के मुलांमध्ये करोना अँटीबॉडीज आढळल्या आहेत. तर, १८ ते ४४ वर्षाच्या ६६.७ टक्के, ४५ ते ६० वर्षांच्या ७७.६ टक्के आणि ६० वर्षावरील ७६.७ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज दिसून आल्या आहेत. सर्वेमध्ये सहभागी ६९.२ टक्के महिला आणि ६५.८टक्के पुरूषांमध्ये कोविड विरोधात अँटीबॉडीज आढळल्या आहेत. शहरी भागात राहणाऱ्या ६९.६ टक्के आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या ६६.७ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज होत्या. या सर्वेमध्ये सहभागी १२ हजार ६०७ लोक असे होते ज्यांनी लस घेतलेली नव्हती. ५ हजार ३८ जण असे होते ज्यांनी एक डोस घेतलेला आहे आणि २ हजार ६३१ जण दोन्ही डोस घेतलेले होते. सर्वेद्वारे समोर आले की, दोन्ही डोस घेतलेल्या ८९.८ टक्के जणांमध्ये आणि एक डोस घेतलेल्या ८१ टक्के जणांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत. तर ज्यांनी लस घेतली नव्हती अशा पैकी ६२.३ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज दिसून आल्या. त्यामुळे असे मानले जात आहे की लस घेतल्यानंतर अँटीबॉडीज निर्माण होत आहे.