सावधान! देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत पुन्हा होतेय वाढ
कोरोना इम्पॅक्ट बातमी

सावधान! देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत पुन्हा होतेय वाढ

नवी दिल्ली : देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे पाहायला मिळत होते. त्यानंतर आता पुन्हा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. २६ ऑगस्टपासून कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने ४० हजारांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे कोरोना कमी होतोय ही भावना मनात ठेवून निष्काळजीपणा न करता खबरदारी घेणं गरजेचे असल्याच्या सूचना केंद्र सरकारकडून देण्यात येत आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

२६ ऑगस्टला बुधवारी देशात ४६ हजार १६४ कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. तसेच ६०७ जणांचा मृत्यू झाला होता. त्या तुलनेने देशातील आजची रुग्णसंख्या थोडी कमी असली तरी देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४२ हजार ९०९ रुग्ण आढळले आहेत. तर ३८० जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या ३ लाख ७६ हजार ३२४ रुग्ण उपचाराधीन आहेत. रविवारी दिवसभरात ३४ हजार ७६३ जण करोनातून बरे झाले असून देशाचा रिकव्हरी रेट सध्या ९७.५१ टक्क्यांवर आहे. आतापर्यंत करोनातून ३ कोटी १९ लाख २३ हजार ४०५ रुग्ण बरे झाले आहेत. देशातील नव्या कोरोनाग्रस्तांचा ४० हजारांच्या खाली आलेला आकडा हा आता पुन्हा ४० हजारांच्या वर जाताना दिसत आहे.

देशातील आठवडी पॉझिटीव्हिटी रेट २.४२ टक्क्यांवर असून हा दर गेल्या ६५ दिवसांपासून ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर, डेली पॉझिटीव्हीटी दरात वाढ झाली असून ३४ दिवसांनी हा दर पुन्हा तीन टक्क्यांपेक्षा वर गेला आहे. सध्या डेली पॉझिटीव्हीटी रेट ३.२ टक्क्यांवर आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत देशात ३२ लाख १४ हजार ६९६ जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. यासह एकूण लसीकरण ६३. ४३ टक्क्यांवर झालं आहे.