सावधान! तर बर्थडे बॉयला खावी लागणार पोलीस ठाण्याची हवा
बातमी मराठवाडा

सावधान! तर बर्थडे बॉयला खावी लागणार पोलीस ठाण्याची हवा

नांदेड : शहरातील काही भागांमध्ये रस्त्यावर वाढदिवस करण्याचे प्रकार वाढले असून गेल्या काही दिवसांपासून या प्रथेत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर बर्थडे बॉयला हारतुरे घालून केक कापून फटाक्यांची आतषबाजी करण्यात येत असल्याने रस्त्यावरील वाहनांना या प्रकारचा विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे असे प्रकार आढळून आल्यास बर्थडे बॉयला पोलिस ठाण्याची हवा खावी लागणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शहरातील व शहराबाहेरील रस्त्यांवर अथवा रस्त्याच्या कडेला कॉलनीतील उभरते नेतृत्व, तसेच समाजसेवक, कार्यकर्ते यांचे वाढदिवस साजरे करण्यात येत आहेत. वाढदिवसानिमित्त आजूबाजूच्या परिसरातील ५०-१०० माणसे जमा होतात रस्त्यांवर टोल किंवा खुर्चीवर केक ठेवून ते कापतात. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होतो.

शहरात सार्वजनिक रस्त्यावर व चौकांमध्ये होणारे वाढदिवस बंद करण्यासाठी पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार यापूर्वी कारवाई करण्यात आली आहे. यापुढे शहरात असे प्रकार होत असतील तर स्थानिक नागरिकांनी पोलिस आयुक्तालयाशी संपर्क साधून माहिती द्यावी. वाढदिवस होणाऱ्या व्यक्तीसह सहभागी असलेल्या लोकांवर तात्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचे नांदेडचे गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी म्हटले आहे.

तर होईल गुन्हा दाखल
– रस्त्यावर वाहने उभी करून केक कापणे
– तलवारीने खंजरने केक कापणे
– डीजेवर गाणे लावून रस्त्यावरच नाचणे
– मध्यरात्री फटाक्यांची आतषबाजी करून ध्वनीप्रदूषण करणे
– पाचपेक्षा जास्त लोकांनी गर्दी करणे
– आरडाओरडा करणे
– घोषणाबाजी करणे
– वाहतुकीला अडथळा निर्माण करणे