धक्कादायक ! मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गर्भवती महिला अधिकाऱ्याची आत्महत्या
बातमी विदर्भ

धक्कादायक ! मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गर्भवती महिला अधिकाऱ्याची आत्महत्या

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल राष्ट्रीय उद्यान अंतर्गत येणाऱ्या हरीसाल वन परीश्रेत्रात कार्यरत आरएफओ दीपाली चव्हाण या २८ वर्षीय तरूण महिला अधिकाऱ्याने शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दीपाली अतिशय डॅशिंग अधिकारी होत्या. त्यांनी आत्महत्या केली हे अनेक अधिकारी अजूनही मानायला तयार नाहीत. मूळच्या सातारच्या असणाऱ्या दिपाली चव्हाण यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र वन सेवा 2014 परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. जिथे माणसं कामं करायला घाबरतात तिथे त्यांच्या कामाची सर्वत्र चर्चा होती. रेल्वे गाडीत बसून डिंक तस्कर पळून गेल्यावर दुचाकीद्वारे मध्यप्रदेशपर्यंत पाठलाग करत आरोपींना सळो की पळो करुन सोडले होते. त्यातून त्यांची ओळख लेडी सिंघम अशी झाली होती.

कमालीचे डेअरिंग आणि स्वभावाने हसमुख व आधुनिक विचारांच्या दिपाली आत्महत्या करुच शकत नाही, असा अंदाज परिचितांनी वर्तवला आहे. माणसांना लाजवेल काहीशी त्यांची कामगिरी होती. पण त्यांच्या कर्तबगारीला वरिष्ठ अधिकाऱ्यांची नजर लागल्याचे वनखात्यात बोलले जात आहे. त्यांची वेळोवेळी मुस्कटदाबी केली जात होती. गर्भवती असताना त्या मालूर येथे कच्च्या रस्त्यातून पायी फिरत होत्या. सुट्टी दिली जात नव्हती. पगार रोखून धरला जात होता. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात त्यांनी या सर्व गोष्टी लिहिल्या आहेत. हरिसाल येथे रूजू झाल्यापासुन त्यांच्या मोबाइलचे सर्व रेकॉर्ड तपासले गेले पाहिजे. तेव्हा कुठे दिपालीचा बळी घेणारे हाती लागतील, अशी मागणीदेखील होत आहे.