पाणी पिण्यासाठी मंदिरात गेलेल्या मुस्लीम मुलाला मारहाण; एकाला अटक
देश बातमी

पाणी पिण्यासाठी मंदिरात गेलेल्या मुस्लीम मुलाला मारहाण; एकाला अटक

उत्तर प्रदेश : मंदिरात पाणी पिण्यासाठी आलेल्या मुस्लीम धर्मीय मुलाला मारहाण केल्याची घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून उघडकीस आली आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे मुलाला मारहाण करतानाच या घटनेचं चित्रिकरण करण्यात आलं होतं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी एक पथक तयार केलं होतं. या प्रकरणात भागलपूरच्या गोपाळपूर पोलीस ठाणे हद्दीत एकाला अटक करण्यात आली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गाझियाबाद पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल करून आरोपीला ताब्यात घेतलंय. गाझियाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्वनीकुमार यादव याचा मुलगा श्रृंगी नंदन यादव याला मारहाणी प्रकरणी अटक करण्यात आलीय. हा तरुण हिंदू एकता संघ नावाच्या संस्थेशीही संबंधित असल्याचे समोर आले आहे. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मारहाण झालेल्या मुलाचा शोधही घेण्यात येत आहे.

दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओत आरोपी श्रृंगी यादव एका मुलाला त्याचं आणि वडिलांचं नाव विचारताना दिसत आहे. मुलाच्या नावावरून तो मुस्लीम धर्मीय असल्याचं लक्षात येत आहे. ‘तू मंदिरात प्रवेश केलासच कसा?’ असा प्रश्न विचारत आरोपी मुलाला मारहाण करताना या व्हिडिओतून स्पष्टपणे दिसून येतंय. ज्या मुलाला मारहाण करण्यात आली तो आपण ‘पाणी पिण्यासाठी मंदिरात आलो होतो’ असं उत्तर देतानाच मारहाण न करण्याची विनंती करताना दिसत आहे.

धर्माचा ठेकेदार बनलेल्या या गुंडांनी मुलाला कोणतीही सहानुभूती न दाखवता केवळ मंदिरात प्रवेश केल्यामुळे मारहाण केल्याचं व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलं. या घटनेचे तीव्र पडसाद सोशल मीडियात उमटलेले दिसून आले.