कोहलीबाबत पोलिसांनी केले ट्वीट; पण ट्रोल झाल्यानंतर केलं डिलीट!
क्रीडा

कोहलीबाबत पोलिसांनी केले ट्वीट; पण ट्रोल झाल्यानंतर केलं डिलीट!

नवी दिल्ली : उत्तराखंडच्या पोलिसांनी विराट कोहलीसंदर्भात एक ट्वीट करून त्याच्या चाहत्यांची नाराजी ओढवून घेतली. या ट्वीटनंतर उत्तराखंड पोलिसांना भारतीय क्रिकेट चाहत्यांनी फैलावर घेतल्यानंतर अखेर उत्तराखंड पोलिसांना हे ट्वीट डिलीट करावं लागलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यामध्ये विराट कोहली शून्य धावांवर बाद झाला. गेल्या महिन्याभरात विराट कोहली तिसऱ्यांदा शून्यावर बाद झाला असून त्याच संदर्भात ट्वीट करून जनतेला संदेश देणं उत्तराखंड पोलिसांना अडचणीत टाकणारं ठरले.

कोहली शून्यावर बाद झाल्याची बरीच चर्चा झाली. उत्तराखंड पोलिसांनी त्याचाच फायदा घेऊन लोकांमध्ये ट्रॅफिकच्या नियमांसंदर्भात जनजागृती करण्यासाठी ट्वीट केलं. या ट्वीटमध्ये उत्तराखंड पोलिसांनी विराट कोहलीचा हेल्मेट घातलेला आणि मैदानातून बाहेर जातानाचा फोटो ट्वीट केला होता. त्यामध्ये पुढे त्यांनी म्हटलं होतं, फक्त हेलमेट घालणं पुरेसं नाही. पूर्ण काळजीपूर्वक शुद्धीमध्ये गाडी चालवणं देखील गरजेचं आहे. नाहीतर कोहलीप्रमाणेच तुम्ही देखील शून्यावर बाद होऊ शकता! या ट्वीटमध्ये पुढे #Ind vs Eng आणि #ViratKohli देखील लिहिलं होतं. पण विराट कोहली आणि टीम इंडियाच्या पराभवामुळे आधीच भ्रमनिरास झालेल्या क्रिकेट चाहत्यांनी आपला राग उत्तराखंड पोलिसांच्या या ट्वीटवर काढायला सुरुवात केली. त्यानंतर उत्तराखंड पोलिसांकडून हे ट्विट डिलीट करण्यात आले.