मोठी बातमी : काँग्रेस खासदारावर प्राणघातक हल्ला
देश बातमी

मोठी बातमी : काँग्रेस खासदारावर प्राणघातक हल्ला

नवी दिल्ली : दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर काँग्रेस खासदारावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. काँग्रेस खासदार रणवीत सिंह बिट्टू यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. रणवीत सिंह बिट्टू यांना धक्काबुक्की करण्यात आली, तसंच त्यांची पगडीही खेचण्यात आली. रणवीत सिंह जनसांसद कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी गेले असता हा प्रकार घडला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी त्यांच्यासोबत अमृतसरचे खासदार गुरजीत सिंह आणि आमदार कुलबीर सिंह उपस्थित होते. रणवीत सिंह यांच्या वाहनाचीही तोडफोड करण्यात आली आहे. रणवीत सिंह यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपल्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती दिली आहे. काही असामाजिक तत्वं ज्यांचा हेतू अस्पष्ट आहे त्यांनी आम्हा तिघांवर प्राणघातक हल्ला करुन परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केला, असं रणवीत सिंह यांनी म्हटलं आहे.

रणवीत सिंह यांना संतप्त आंदोलकांनी धक्काबुक्कीदेखील केली. या झटापटीत कुलबीर सिंह यांचीही पगडीदेखील निघाली. काही लोकांनी रणवीत सिंह यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या वाहनांपर्यंत सुरक्षितपणे नेलं. रणवीत सिंह गाडीत बसल्यानंतरही काहीजणांनी काठ्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. दरम्यान रणवीत सिंह यांच्यावरील हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.