पीएफसंदर्भात अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय
देश बातमी

पीएफसंदर्भात अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय

नवी दिल्ली : गेल्या दीड वर्षापासून देशात कोरोनाचे मोठे संकट घोंगावत आहे. या संकटातून बाहेर येण्यासाठी पीएफ संदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. गेल्या वेळी आत्मनिर्भर रोजगार योजनेअंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या घोषणेनुसार ज्या कंपन्यांची कर्मचारी संख्या १००च्या आत आहे आणि नव्याने नोकरीवर ठेवण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महिना पगार १५ हजारपर्यंत आहे, अशा कर्मचाऱ्यांचा १२ टक्के पीएफचा हिस्सा आणि अशा कंपन्यांचा पीएफमधील १२ टक्के असा एकूण २४ टक्के पीएफचा हिस्सा हा केंद्र सरकारकडून भरला जाईल. आता या योजनेची मर्यादा पुढे वाढवत ३० जून २०२१ पासून ३१ मार्च २०२२ पर्यंत करण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्याचबरोबर, गेल्या वेळी जाहीर करण्यात आलेल्या ३ लाख कोटींच्या इमर्जन्सी क्रेडिट लाईन योजनेच्या रकमेमध्ये अजून दीड लाख कोटींची भर यावेळी घालण्यात आली आहे. यासंदर्भात विभागनिहाय निधी वितरणाची माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल. गेल्या वेळी यासाठी ३ लाख कोटींची घोषणा करण्यात आली होती. त्यातल्या २ लाख ६९ कोटींचं वितरण व्यापारी, उद्योग, बँक, आणि इतर कंपन्यांना करण्यात आलं. याची मर्यादा आता ४.५ लाख कोटींपर्यंत वाढवण्यात आली आहे. अर्थात अतिरिक्त दीड लाख कोटींची वाढ करण्यात आली आहे.

२३ हजार २२० कोटी रुपयांची घोषणा लहान मुलांसाठीच्या आरोग्य सुविधेसंदर्भातल्या (बालरोग) कामांसाठी या वर्षी ही रक्कम खर्च करण्यात येईल. ३१ मार्च २०२२ पर्यंत ही रक्कम उपलब्ध करून दिली जाईल.