नॉट रिचेबल संजय राठोड पोहरादेवीचे घेणार दर्शन
बातमी विदर्भ

नॉट रिचेबल संजय राठोड पोहरादेवीचे घेणार दर्शन

यवतमाळ : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर गेल्या दोन आठवड्यांपासून नॉट रिचेबल असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड अखेर समोर आले आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर ते कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत. संजय राठोड आज सकाळी पोहरादेवीच्या दर्शनाला रवाना झाले. शासकीय वाहनांऐवजी स्वतःची लॅन्ड क्रूझर या खासगी गाडीतून त्यांनी प्रवासाला सुरवात केली, यावेळी त्यांच्यासोबत पत्नी शीतल राठोड आणि कुटुंबातील इतर सदस्यही होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राठोड काल यवतमाळ येथील त्यांच्या निवासस्थानी आले. आज सकाळीच संजय राठोड यवतमाळमधील निवासस्थानाहून वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवीला निघाले. हे अंतर 80 किलोमीटर इतके आहे. जवळपास 15-16 गाड्यांच्या ताफ्यासह राठोड रवाना झाले. पोहरादेवी मंदिरांत आल्यावर सुरुवातीला संजय राठोड जगदंबा मातेचं दर्शन घेतील. त्यानंतर पोहरादेवीतील सराव मंदिरात संजय राठोड यांच्या हस्ते पूजेचं नियोजन करण्यात आलं आहे. अशी माहिती पोहरादेवीचे महंत जितेंद्र महाराज यांनी दिली.

पोहरादेवीत बाँम्ब डिस्पोजल वॅन दाखल झाली असून पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे. पोहरादेवीला जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरीकेट्स लावण्याचं काम सुरु आहे. कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीसांकडून काळजी घेतली जात आहे. दुपारी साडेचार वाजता संजय राठोड यांची यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना नियंत्रणाबाबत बैठक घेण्यात येणार आहे.

पोहरादेवी येथील प्रसिद्ध जगदंबा मंदिरात सजावट करण्यात आली आहे. सुनील महाराज यांच्या वतीने सजावट करण्यात आली आहे. जगदंबा मंदिरात होम हवन आणि पूजेची तयारी करण्यात येत आहे. कोरोनामुळे लोकांनी गर्दी करु नये, असं आवाहन आम्ही केलं आहे. संजय राठोड आज शक्तीप्रदर्शन करणार नाहीत, असंही महंत जितेंद्र महाराज यांनी सांगितलं.