नेहरुंच्या पुतळ्याची विटंबना; काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक
देश बातमी

नेहरुंच्या पुतळ्याची विटंबना; काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

झाशी (उत्तरप्रदेश) : माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना उत्तरप्रदेशातील झाशी जिल्ह्यात घडली असून काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी मंगळवारी उत्तर प्रदेशमधील झाशी जिल्ह्यामधील इलाइट चौकामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते जमा झाले होते. मात्र आंदोलनाला सुरुवात करण्याआधीच या चौकात लावण्यात आलेल्या नेहरुंच्या पुतळ्याचे विटंबन झाल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी याच पुतळ्याला फुलांचे हार घालून पुतळ्यासमोर बसून धरणे आंदोलन सुरु केले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रदीप आदित्य जैन यांनी काही समाजकंटकांनी माजी पंतप्रधानांच्या पुतळ्याची तोडफोड केल्याचा आरोप केला. या प्रकरणामध्ये दोषींविरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी जैन यांनी केली. तसेच सध्याचा पुतळा हटवून याच ठिकाणी नवा पुतळा बसवण्यात यावा अशी मागणीही जैन यांनी केली. त्याचप्रमाणे या ठिकाणी जोपर्यंत नेहरुंचा नवा पुतळा बसवला जात नाही तोपर्यंत काँग्रेस कार्यकर्ते धरणे आंदोलन सुरु ठेवतील अशी भूमिका जैन यांनी घेतली आहे.

पोलीस आणि स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांनी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांना आश्वासन दिलं आहे की लवकरच या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली जाईल. काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप आणि गर्दी पाहून या ठिकाणी अतिरिक्त पोलीस दलाला तैनात करण्यात आलं. कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या आजच्या भारत बंदला ११ राजकीय पक्षांनी समर्थन दिलं आहे.