चेतननं मला तीनदा भोसकलं; चौथ्यांदा चाकू मारणार इतक्यात..; वाचलेल्या वाघमारेंनी सांगितला थरार
बातमी मुंबई

चेतननं मला तीनदा भोसकलं; चौथ्यांदा चाकू मारणार इतक्यात..; वाचलेल्या वाघमारेंनी सांगितला थरार

मुंबई: पत्नी आणि मुलं वेगळी राहत असल्याच्या रागातून पन्नाशीतील इसमानं त्याच्या शेजाऱ्यांवर चाकू हल्ला केल्याची घटना १० दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईच्या ग्रँटरोडमध्ये घडली. चाकूहल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. या जखमींपैकी एक असलेले प्रकाश वाघमारे उपचार घेऊन परतले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र २४ मार्चच्या कटू आठवणी आजही त्यांच्या मनात ताज्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्यानं (चेतन गाला) माझ्यावर चाकूनं हल्ला केला केला हे मला अद्यापही माहीत नाही. त्या दिवसाची आठवण आजही माझ्या मनात आहे, असं ५२ वर्षांच्या प्रकाश वाघमारेंनी सांगितलं. ‘मला आता या जागेची (सोसायटी) भीती वाटते. मी हे शहर सोडायचं ठरवलं आहे,’ असं वाघमारे म्हणाले. आरोपी चेतन गालांचं कुटुंब त्यांना सोडून गेलं होतं. पत्नी आणि मुलं वेगळी राहत होती. त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न वाया गेले होते. शेजाऱ्यांनी भडकावल्यामुळेच पत्नी आपल्यापासून दूर गेल्याचा गाला यांचा समज होता. त्याच रागातून गाला त्यांच्या शेजाऱ्यांवर चाकूनं सपासप वार करत सुटले.

वाघमारे यांच्यावर गाला यांनी चाकूनं तीन वार केले. गेल्या गुरुवारी वाघमारेंना डिस्चार्ज मिळाला. पार्वती मॅन्शन इमारतीमधील अनेकांनी गाला यांना मदत केली. रुग्णालयानं त्यांचं बिल माफ केलं. इमारतीमधील रहिवाशांनी वाघमारेंना एक खोली, अन्न आणि औषधं पुरवली आहे. वाघमारे दुखापतीमधून सावरेपर्यंत त्यांची सोय एका खोलीत करण्यात आली आहे. वाघमारे सोसायटीच्या वऱ्हाड्यांत झोपायचे. रहिवाशांच्या घरातील छोटीमोठी कामं करून उदरनिर्वाह चालवायचे.

माझ्या समोर ७० वर्षांच्या इलाबेन मिस्त्री रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यानंतर चेतननं इलाबेन यांचे पत्नी आणि १८ वर्षांच्या जेनिलवर हल्ला केला. त्यांचाही मृत्यू झाला. चेतननं त्याची टार्गेट आधीच ठरवली होती की तो दिसेल त्याला मारत होता, याचा विचार मी आजही करतोय, असं वाघमारे म्हणाले. चेतनचं कुटुंब दोन महिन्यांपूर्वी त्याला सोडून गेलं. त्यावेळी माझं त्याच्यासोबत शेवटचं बोलणं झालं. माझ्या घरात काम करणं थांबव. मी तुला पैसे देऊ शकणार नाही, असं चेतन मला म्हणाला होता. आमच्यातला शेवटचा संवाद हाच होता, असं वाघमारेंनी सांगितलं.

आपल्या घरातून बाहेर पडलेला चेतन मिस्त्री सर्वप्रथम शेजारी राहणाऱ्या इलाबेन यांच्या घरात शिरला. त्यानं इलाबेन यांना भोसकलं. यानंतर तो घरातून बाहेर पडला. त्याला वऱ्हांड्यात झोपलेले वाघमारे दिसले. त्यानं तीनवेळा वाघमारेंच्या पोटात चाकू भोसकला. ‘त्यानं तीनवेळा माझ्या पोटात चाकू भोसकला. त्यानंतर मी उशीनं स्वत:चा बचाव केला. यानंतर चेतन स्नेहल ब्रह्मभट यांच्यावर हल्ला करण्यास गेला. त्याच सुमारास रक्षाबेन यांनी मला खेचून घरात घेतलं आणि कडी लावली. त्यामुळे माझा जीव वाचला,’ अशा शब्दांत वाघमारेंनी २४ मार्चचा घटनाक्रम सांगितला.