मध्यप्रदेशातून पिस्तूल आणून नांदेडमध्ये विकायचे, एका प्रकरणात टीप मिळाली, पोलिसांकडून तिघांचा करेक्ट कार्यक्रम
बातमी मराठवाडा

मध्यप्रदेशातून पिस्तूल आणून नांदेडमध्ये विकायचे, एका प्रकरणात टीप मिळाली, पोलिसांकडून तिघांचा करेक्ट कार्यक्रम

नांदेड : काही दिवसांपूर्वी शहरात झालेल्या गोळीबारच्या घटनेनंतर नांदेड पोलीस सतर्क झाले आहेत. शहरात विविध ठिकाणी ऑलआउट ऑपरेशन राबवून गुन्हेगारांकडून शस्त्रे जप्त केली जात आहे. शनिवारी वजीराबाद पोलिसांनी तीन सराईत गुन्हेगारांना अटक करुन चार पिस्तूल आणि ३० जिवंत काडतूस जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेले काडतूस आणि पिस्तूल मध्यप्रदेश राज्यातून खरेदी केल्याचे तपासात स्पष्ट झालं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दोन दिवसापूर्वी वजीराबादच्या डीबी पथकाने गोवर्धनघाट परिसरात एका आरोपीकडून पिस्तूल जप्त केली होती. तपासा दरम्यान सिडको येथील भोलासिंग उर्फ हरजीतसिंघ उर्फ पोलो चरणसिंघ बावरी याच्या कडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस भोलासिंग वर पाळत ठेवत होते. आरोपी हा हिंगोलीगेट परिसरात पिस्तूल विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून आरोपीला ताब्यात घेतले. अंग झडती घेतल्यानंतर आरोपीकडे एक पिस्तूल आणि ७ जिवंत काडतूस आढळून आले. सदरच्या आरोपीची चौकशी केली असता त्याने तीन पिस्तूल आणि काडतूस विक्री केल्याची माहिती समोर आली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी महम्मद तौफिक शेख सनदलजी याच्याकडून एक पिस्तूल आणि २३ काडतूस आणि गोविंदनगर येथील रोशन सुरेश हाळदे याच्याकडून एक पिस्तूल जप्त केले.

विशेष म्हणजे यातील मुख्य आरोपी भोलासिंग हा मध्यप्रदेश हून पिस्तूल आणून ३० हजार रुपयात विक्री करायचा. त्याच्यावर चार ते पाच गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील आहेत. अनेक गुन्ह्यात त्याने शस्त्राचा वापर देखील करत होता. दरम्यान या प्रकरणात मोठं रॅकेट असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. कारवाईसाठी पोलिसांचा एक पथक देखील मध्यप्रदेशला रवाना करण्यात आलं आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर वाढत असलेल्या गुन्हेगारीमुळे पोलीस त्रस्त असताना या कारवाईमुळे अशा गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

चालू वर्षात १७ पिस्तूल जप्त

शहरात गेल्या वर्षभरात अवैधरित्या गावठी कट्टे वापरुन गोळीबाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. मागील वर्षी नांदेड पोलिसांनी आरोपी कडून ३९ पिस्तूल जप्त केले होते. या चालू वर्षात म्हणजेच साडे तीन महिन्यात १७ पिस्तूल आरोपीकडून जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली