बालभारतीचा अक्षरठेवा वाचकांच्या भेटीला; एक लाख ५५ हजार ग्रंथ, पुस्तकांचा संग्रह
पुणे बातमी

बालभारतीचा अक्षरठेवा वाचकांच्या भेटीला; एक लाख ५५ हजार ग्रंथ, पुस्तकांचा संग्रह

पुणेः ‘महाराष्‍ट्र राज्‍य पाठ्यपुस्‍तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळा’च्या (बालभारती) सुसज्ज ग्रंथालयाचे काम पूर्ण झाले असून, वाचक, अभ्यासक, संशोधक; तसेच विद्यार्थ्यांसाठी ते खुले करण्यात आले आहे. या ग्रंथालयामध्‍ये मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, कन्‍नड, सिंधी, तेलुगु आणि उर्दू या भाषांमधील विविध संदर्भ ग्रंथ, ललित साहित्‍य, शब्‍दकोश, ज्ञानकोश, भूवर्णन कोश, नकाशे आदी एक लाख ५५ हजार ग्रंथ आणि पाठ्यपुस्‍तके यांचा विपुल संग्रह आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दुर्मीळ पुस्तकांचा खजिना उपलब्ध

– माजी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ग्रंथालय निर्मितीची घोषणा केली होती.

– त्यानुसार हे ग्रंथालय ‘बालभारती’च्या सेनापती बापट रस्त्यावरील कार्यालयात सुरू झाले आहे.

– या ग्रंथालयात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नियतकालिके, इतर राज्‍यातील पाठ्यपुस्‍तके, शिक्षण, ललितसाहित्‍य विषयक नियतकालिके व त्‍यांचे खंड; तसेच अनेक दुर्मीळ पुस्तके संग्रहित आहेत.

– या ग्रंथालयाचा उपयोग प्रामुख्‍याने पाठ्यपुस्‍तक मंडळात तयार होणाऱ्या पाठ्यक्रमांसाठी, संशोधनाला आवश्‍यक संदर्भ साहित्‍य उपलब्‍ध करून देण्यासाठी; तसेच शिक्षक आणि पाठ्यपुस्‍तकप्रेमी यांना मर्यादित स्‍वरुपात अभ्यासासाठी करण्यात येत होता.

– वाचकांनी या सुविधेचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन ‘बालभारती’चे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.

ग्रंथालयाविषयी…

– ग्रंथालयातील विपुल ग्रंथसंपदेचा लाभ सामान्य वाचकांना; तसेच विद्यार्थ्यांना व्हावा, यासाठी ते सर्वांना खुले करण्‍यात आले आहे.

– ग्रंथालयाची सशुल्‍क सुविधा वाचक, अभ्यासक, संशोधक; तसेच विद्यार्थांना उपलब्ध असेल.

– सकाळी साडेदहा ते दुपारी दीड आणि दुपारी अडीच ते सायंकाळी साडेपाच या वेळेत साप्‍ताहिक आणि सार्वजनिक सुट्ट्या वगळता ग्रंथालय खुले असेल.

– प्रतिदिन २० रुपये शुल्‍क आकारले जाणार आहे

‘शालेय विद्यार्थ्यांना मोफत करा’

ग्रंथालयात प्रवेशासाठी प्रतिदिन २० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. शहरातील इतर ग्रंथालयांप्रमाणेच या सरकारी ग्रंथालयासाठी शुल्क आकारण्यात येणार आहे. ग्रंथालयाच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्च हा वाचक, अभ्यासक, संशोधकांकडून येणाऱ्या शुल्कातून होऊ शकतो. मात्र, शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, हा ग्रंथालयाचा उद्देश असल्याने ते विद्यार्थ्यांसाठी मोफत करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी केली जात आहे.