देशातील रुग्णवाढ पुन्हा ६० हजारांच्या घरात
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशातील रुग्णवाढ पुन्हा ६० हजारांच्या घरात

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमामात होताना दिसत आहे. मागील २४ तासांत आणखी ५९ हजार ११८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या एका कोटी १८ लाख ४६ हजार ६५२ वर पोहोचली असल्याचे शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्याचप्रमाणे देशातील उपचाराधीन रुग्णांच्या संख्येने साडेतीन महिन्यांनंतर चार लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशात सलग १६व्या दिवशी उपचाराधीन रुग्णांची संख्या चार लाख २१ हजार ०६६ इतकी झाली आहे. हे प्रमाण एकूण बाधितांच्या ३.५५ टक्के इतके आहे. करोनातून बरे होण्याचे प्रमाण ९५.०९ टक्के इतके झाले आहे. देशात गेल्या २४ तासांत आणखी ५९ हजार ११८ जणांना करोनाची लागण झाली, १८ ऑक्टोबर २०२० नंतरचा हा उच्चांक आहे. कोरोनामुळे आणखी २५७ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या एक लाख ६० हजार ९४९ वर पोहोचली आहे. आतापर्यंत एक कोटी १२ लाख ६४ हजार ६३७ जण कोरोनातून बरे झाले आहेत, तर मृत्युदराचे प्रमाण १.३६ टक्के इतके आहे.

कोरोनामुळे गेल्या २४ तासांत २५७ जणांचा मृत्यू झाला त्यापैकी १११ जण महाराष्ट्रातील आहेत. देशात एकूण एक लाख ६० हजार ९४९ जणांचा मृत्यू झाला त्यापैकी ५३ हजार ७९५ जण महाराष्ट्रातील आहेत, असे आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.